रुंदीकरणाच्या कुऱ्हाडीने ५२६ वृक्षांवर घाव! वणी-नाशिक महामार्ग होणार उजाड; सिंहस्थासाठी रस्ता रुंदावणार, पण प्रवाशांचा सावलीचा आधार हरवणार

रुंदीकरणाच्या कुऱ्हाडीने ५२६ वृक्षांवर घाव! वणी-नाशिक महामार्ग होणार उजाड; सिंहस्थासाठी रस्ता रुंदावणार, पण प्रवाशांचा सावलीचा आधार हरवणार
Published on
पान-२ मेन 12881, 12882 वणी ः दिंडोरी-नाशिक रस्त्याच्या रुंदीकरणात अथथळा येत असलेल्या झाडांची करण्यात आलेली कत्तल. (फोटो- दिगंबर पाटोळे) रुंदीकरणाच्या कुऱ्हाडीने ५२६ वृक्षांवर घाव वणी-नाशिक महामार्ग होणार उजाड; प्रवाशांचा सावलीचा आधार हरवणार दिगंबर पाटोळे ः सकाळ वृत्तसेवा वणी, ता. ६ : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-दिंडोरी-वणी (प्ररामा ०३) मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा वर्षानुवर्षे प्रवासी व भाविकांना सावली देणाऱ्या, उन्हाळ्यात दिलासा देणाऱ्या ५२६ जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विकासासाठी रस्ता रुंदावणार असला, तरी या वृक्षांच्या तोडीमुळे वणी-नाशिक महामार्गाचा हिरवा चेहरा उजाड होणार आहे. ................. नाशिक-दिंडोरी-वणी मार्गावरील ग्लोबल स्कूल ते अक्राळे फाटा या रस्त्याच्या सिंहस्थ कुंभमेळ्याअंतर्गत रुंदीकरणाचे काम चार महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. रस्त्यालगतच्या बाजू पट्ट्यांवरील जुनी झाडे अडथळा ठरत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने वन विभागाकडे वृक्षतोडीची परवानगी मागितली होती. वन विभागाच्या आदेशानुसार रस्त्याच्या डाव्या बाजूची २९४ आणि उजव्या बाजूची २३२, अशी एकूण ५२६ झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून वृक्षतोड वेगाने सुरू आहे. या मार्गावरून रोज हजारो प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच सप्तशृंगगडाकडे जाणारे पदायात्रेकरू, भाविक प्रवास करतात. उन्हाळ्यात या रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे प्रवाशांसाठी नैसर्गिक सावलीचा आधार ठरतात. दूरचा प्रवास करताना एखाद्या झाडाखाली क्षणभर विसावा घेणे, वाहन थांबवून उन्हापासून बचाव करणे, ही या मार्गावरची नेहमीची दृश्ये होती. आता रुंदीकरणासाठी हीच झाडे जमीनदोस्त होताना पाहून पर्यावरणप्रेमी आणि प्रवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. रस्ता रुंदावणे ही काळाची गरज असली, तरी विकासाच्या या प्रक्रियेत जुन्या वृक्षांचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. दरम्यान, तोडण्यात येणाऱ्या ५२६ वृक्षांचे मूल्यांकन ४६ लाख नऊ हजार ३४५ रुपये इतके करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडून ही रक्कम वसूल करून त्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. सिंहस्थासाठी रस्ता रुंदावणे आवश्यक आहे; मात्र या विकासाच्या वाटेवर निसर्गाची किंमत मोजावी लागू नये, अशीच प्रवाशांची आणि पर्यावरणप्रेमींची भावना आहे. आज कुऱ्हाडीखाली जाणाऱ्या या वृक्षांच्या जागी उद्याची दन हजार ६३० रोपे किती जगतील, किती मोठी होतील आणि पुन्हा प्रवाशांना सावली देतील, याचे उत्तर काळच देणार आहे. .................................. चौकट ५२६ वृक्षांच्या बदल्यात दोन हजार रोपे वृक्षतोड अधिनियम १९६४ नुसार तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या संख्येच्या पाचपट म्हणजे सुमारे दोन हजार ६३० नवीन झाडे लावणे बंधनकारक आहे. त्याबाबतचा अहवाल वन विभागाला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात होणारी वृक्षलागवड केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात याच मार्गाच्या परिसरात हिरवाई निर्माण करणारी ठरावी, अशी अपेक्षा आहे. .....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com