VNI26B12901
वणी ः राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत यशस्वी सरस्वती विद्या मंदिराचे विद्यार्थी व प्रशिक्षक.
---------------
सरस्वतीच्या विद्यार्थ्यांची शाळेतर्फे मिरवणूक
---------------
राष्ट्रीय स्पर्धसाठी निवड ः शालेय मल्लखांब व ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत तब्बल ४० पदके
----------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. ७ : धुळे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत वणी येथील सरस्वती विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत तब्बल ४० पदकांची कमाई केली. या घवघवीत यशाबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांचा सोमवारी (ता.७) शाळेत फेटे बांधून आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. त्यानंतर लेझीम व ढोलपथकाच्या निनादात विजेत्या विद्यार्थ्यांची गावातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
-------------
धुळे येथे ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान झालेल्या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत सरस्वती विद्या मंदिराच्या सात मुली व १३ मुलांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची छाप पाडत १४ सुवर्ण, १९ रौप्य आणि सात कांस्यपदके अशी एकूण ४० पदके पटकावली. तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरीनंतर राज्यस्तरावरही विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली.
विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यानंतर ढोलपथक आणि लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी पदकांसह सहभाग घेतल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले. विविध ठिकाणी नागरिकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
राज्यस्तरीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सरस्वती विद्या मंदिराच्या १५ विद्यार्थ्यांची डेहराडून (उत्तराखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला आणखी मोठे यश मिळाले आहे.
विद्यार्थ्यांच्या यशासाठी क्रीडाशिक्षक सिद्धार्थ चंद्रमोरे, मुख्याध्यापिका सविता मोरे, सलोनी कड, अनुराधा तिवारी यांनी विशेष परिश्रम घेतले. संतोष कड यांनी विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेतली. शिक्षक, पालक आणि नागरिकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
१६-१
राष्ट्रीय स्पर्धेचे वेध
राज्यस्तरीय स्पर्धेत ४० पदकांची कमाई केल्यानंतर आता सरस्वती विद्या मंदिराच्या १५ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. डेहराडून येथे होणाऱ्या या स्पर्धेतही विद्यार्थी चमकदार कामगिरी करून वणीचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करतील, असा विश्वास पालक व शिक्षकांनी व्यक्त केला.
----------