टुडे- पान-१ ॲंकर
----------------
धनश्री राठी : VNI26B12927 ( शक्य झाल्यास कटआऊट करणे)
----------------
बुद्धिबळ स्पर्धेमध्ये धनश्री राठीचा स्पेनमध्ये झेंडा
------------
कॅटलॅन आंतरराष्ट्रीय मालिकेत चमकदार कामगिरी; १४४ रेटिंगची वाढ, १९६५ रेटिंगसह ५९० युरोचे बक्षीस
------------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.११ : आंबे दिंडोरीसारख्या ग्रामीण भागातून बुद्धिबळाच्या पटावर आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करणाऱ्या धनश्री अनिल राठी हिने स्पेनमध्ये झालेल्या कॅटलॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांच्या मालिकेत उल्लेखनीय यश मिळविले. ‘माय स्पोर्ट ट्रिप इंडिया’चे अंकित दलाल यांच्या माध्यमातून स्पेनमध्ये झालेल्या पाच स्पर्धांमध्ये सहभागी होत धनश्रीने तब्बल १४४ रेटिंग गुणांची वाढ नोंदवत १९६५ रेटिंगचा टप्पा गाठला. या कामगिरीसोबत तिने एकूण ५९० युरोचे बक्षीस व ट्रॉफी पटकावली.
----------------
स्पेनमध्ये झालेल्या ओपन इंटरनॅशनल व्हॅलेन्शिया स्पर्धेतील ‘बी’ गटात धनश्रीने पाचवा क्रमांक मिळवत १९० युरोचे बक्षीस मिळविले. त्यानंतर ओबर्ट इंटरनॅशनल सेंट मार्टि सिटी बुद्धिबळ स्पर्धेत तिने दुसरा क्रमांक पटकावत ४०० युरोचे रोख बक्षीस व ट्रॉफीवर नाव कोरले.
ओपन इंटरनॅशनल सेंटझिन स्पर्धेतही धनश्रीने प्रभावी खेळ करत १५ रेटिंग गुणांची कमाई केली. ओबर्ट इंटरनॅशनल बादालोना स्पर्धेत तिने आणखी सरस कामगिरी केली. राजन्या दत्त हिचाही पराभव करत आपल्या आंतरराष्ट्रीय अनुभवाची छाप उमटविली. मालिकेतील पाचव्या ओबर्ट इंटरनॅशनल सेंट आंद्रिया स्पर्धेत तिने लॅम्पु मेरियाना हिला पराभूत करून लक्षवेधी कामगिरी केली.
१६-१ चौकट
स्वतः शिकवते अन् खर्च भागविते
धनश्रीची विशेष बाब म्हणजे ती डी चेस झोन अकॅडमीच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण देते आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून स्वतःच्या स्पर्धांचा खर्च भागवते. ग्रामीण भागातील मर्यादित साधनसुविधांवर मात करत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. २०२६ मध्ये जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडा खेळाडू म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला होता. तिला दहा हजार रुपये रोख व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. धनश्रीच्या यशात ईशान चेस अकॅडमीचे अमित गंगाधर तारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिनियेश चेस अकॅडमीचे ओंकार जाधव, संदीप नागरे, प्रथमेश धर्माधिकारी आणि शरद तिडके यांचेही मार्गदर्शन तिला मिळाले.
------------