YEO26B25302
येवला : ऋणमुक्तेश्वर व महामृत्युंजय मंदिरात महादेवाच्या पिंडीला प्रदोष पर्वानिमित्त करण्यात आलेला शृंगार.
--------------
प्रदोषानिमित्त शिवभक्तांची मांदियाळी
--------------
येवला ः महामृत्युंजय व ऋणमुक्तेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी
--------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१५ : शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय व ऋणमुक्तेश्वर मंदिरात प्रदोष पर्वानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
पहाटेपासूनच शिवभक्तांच्या रांगांनी मंदिर परिसर फुलून गेला. सायंकाळी महादेवाच्या पिंडीवर दूध, दही, तूप, मध आणि पंचामृताचा विधिवत महाअभिषेक करण्यात आला. हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता.
शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिर परिसरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती दिनानिमित्त भव्य रांगोळी काढण्यात आली होती. शंभूराजे जयंतीचे औचित्य साधून नंदीभोवती केलेली ही कलात्मक सजावट आणि रांगोळी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. शिवभक्तांनी यावेळी शंभूराजांना अभिवादन करत जयंतीचा उत्साह द्विगुणित केला. मंदिर समिती आणि स्थानिक शिवभक्तांच्या नियोजनामुळे हा संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडला. श्रद्धेचा आणि इतिहासाच्या अभिमानाचा एक आगळावेगळा संगम या निमित्ताने येवलेकरांना अनुभवता आला.
येथील ऐतिहासिक व जागृत देवस्थान मानल्या जाणाऱ्या ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात प्रदोष निमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सोहळ्याचे मुख्य आकर्षण महादेवाला करण्यात आलेला श्री शनी भगवान रूपातील देखणा शृंगार करण्यात आला होता.
सायंकाळी प्रदोष काळाच्या मुहूर्तावर भगवान शिवशंकराचा जलाभिषेक व महापूजा करण्यात आली. शृंगार पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पूजेनंतर शास्त्रोक्त पद्धतीने भस्म आरती करण्यात आली. धुपारती आणि भस्माच्या उधळणीने वातावरणात एक वेगळीच सकारात्मकता निर्माण झाली होती. शनी देवाच्या रूपातील हा दुर्मिळ शृंगार डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.
---------------