पान-३
----------
YEO26B25699
येवला : येथील तहसील कार्यालयासमोर काम बंद आंदोलनात सहभागी झालेले तलाठी व ग्राममहसूल अधिकारी, कर्मचारी.
----------
हल्ल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद
----------
येवला ः निवासी नायब तहसीलदारावर हल्ला, दिवसभर ठिय्या, कठोर कारवाईची मागणी
--------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. २२ : पारेगाव येथे अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या निवासी नायब तहसीलदार व ग्राममहसूल अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तालुका तलाठी संघ, महसूल कर्मचारी संघटना आणि महसूल सेवक संघटनेतर्फे सोमवारी (ता.२२) लाक्षणिक कामबंद आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
पारेगाव परिसरातील तळ्यालगत शनिवारी अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, ग्राममहसूल अधिकारी संतोष आठवले व वैभव भड यांना मारहाण करण्यात आली. घटनास्थळी शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी भेट दिल्यानंतरही मुरूम वाहतूक करणाऱ्या पोलिस निरीक्षकांसमोर महसूल अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली होती. शहर पोलिस ठाण्यात निवासी नायब तहसीलदार नेवसे यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकास अटक केली असून एक जण फरार झाला आहे.
या घटनेमुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय गिरी, उपाध्यक्ष सविता धिवर, सरचिटणीस श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर आर. एस. देशमुख, व्ही. पी. भड, समर्थ कांदळकर, बाळासाहेब हावळे, शुभम अलवट, परेश रायजादे, मनीषा इगवे, अनिल बावस्कर यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.
अवैध वाळू, मुरूम व गौण खनिज उत्खननाविरोधात कारवाई करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांवर वारंवार दबाव टाकला जात आहे. अशा घटनांमुळे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापुढील काळात अवैध गौण खनिज कारवाईला जाताना प्रांत, तहसीलदार,पोलिस बंदोबस्त नसल्यास मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी कारवाईला जाणार नाहीत असा इशाराही तलाठी व ग्राम महसूल कर्मचारी संघटनेने निवेदनात दिला आहे. संबंधित संशयितांना तातडीने अटक करून मकोकांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच महसूल कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे. हल्लेखोरांविरुद्ध ठोस कारवाई न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे
--------------