येवल्यात तासाभर मुसळधार पाऊस
वातावरणात गारवा, खरिपाच्या कामांना गती
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. २४ : येवला शहर व परिसरात बुधवारी (ता. २४) सायंकाळच्या सुमारास झालेल्या तासभर जोरदार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा उकाडा कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, खरीप हंगामाच्या पेरणीसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
--
सकाळपासूनच परिसरात रिमझिम सरी कोसळत होत्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन पावसाचे ढग जमा झाले होते. दुपारनंतर सुमारे तीन वाजेच्या सुमारास अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि पाच ते दहा मिनिटे जोरदार वादळ झाले. त्यानंतर पावसाने रौद्ररूप धारण करत अवघ्या वीस मिनिटांत मुसळधार सुरुवात केली. पुढे तास ते दीड तास कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर कायम राहिला. या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले होते, तर ग्रामीण भागात शेतांमध्ये पाणी साठून जमीन चांगल्या प्रकारे ओलसर झाली आहे.
यापूर्वी तालुक्यात केवळ १७ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस नसल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र, दमदार पावसामुळे जमिनीला आवश्यक ओलावा मिळाल्याने रखडलेल्या पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा बळावल्या असून खरीप हंगामाची सुरुवात उत्साहवर्धक होण्याची चिन्हे आहेत.
--