पान-३
YEO26B26527
येवला : उपजिल्हा रुग्णालयातील मूलभूत समस्यांप्रश्नी अधिकार्यांना जाब विचारताना कुणाल दराडे व शिवसेनेचे पदाधिकारी.
---------------
उपजिल्हा रुग्णालयावरच उपचाराची वेळ
------------
येवल्यात शिवसेनेकडून ठिय्या, कुणाल दराडेनी आक्रमक होत विचारला जाब
------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.३१ : प्रशस्त इमारत आणि कोट्यवधीचा खर्च करूनही येथील उपजिल्हा रुग्णालयातून रुग्णांना सक्षम आरोग्य सेवा मिळत नाही. उपचारासाठी एमडी मेडिसिनसारखे तज्ज्ञ डॉक्टर नसून विविध औषधांचा तुटवडा आहे. अनेक यंत्रणा बंदच आहेत. रुग्णांना खासगी दवाखान्यात किंवा जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याची प्रथाच पडली आहे. त्यामुळे या रुग्णालयावरच उपचार करण्याची वेळ आल्याची तक्रार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह युवा नेते कुणाल दराडे यांनी केली. सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
----------
रुग्णांच्या वाढत्या तक्रारी व गैरसोयीमुळे शिवसेनेचे शहरप्रमुख विशाल परदेशी, उपशहरप्रमुख विजय मोरे, पप्पू भुसे, युवा सेनेचे शहरप्रमुख हितेन जावळे, धीरज कडारीया, भाऊ भागवत, शरद सबनीस, शकील पटेल, अक्षय कुलकर्णी, सिद्धार्थ हिरे, मोहजीस अत्तर, सर्वेश राशिनकर आदीसह शिवसैनिकांसह कुणाल दराडे यांनी उपजिल्हा रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक त्रुटी निदर्शनास आल्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमाकांत सोनवणे यांच्या कार्यालयात ठिय्या देत जाब विचारला. तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, औषधांचा व वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, रुग्णांना मोठ्या प्रमाणावर अन्यत्र रेफर करणे, कर्मचाऱ्यांची रुग्णांशी अरेरावी तसेच मूलभूत उपचारांमध्येही येणाऱ्या अडचणींचा पाढाच त्यांनी वाचला.
एम.डी. मेडिसिन आणि एम.एस. सर्जन हे तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध नसून गंभीर आजारांचे रुग्ण, अपघातग्रस्त तसेच प्रसूतीतील गुंतागुंतीच्या घटनांत तज्ज्ञ उपचार मिळत नसल्याने रुग्णांना अन्यत्र हलवावे लागत आहे. सिझेरियन प्रसूती तसेच अपघातातील गंभीर रुग्णांना नाशिक किंवा अन्य ठिकाणी रेफर करावे लागत आहे. साधी पट्टी, कॉटन यांसारखे प्राथमिक वैद्यकीय साहित्यही उपलब्ध नसल्याचा आरोप दराडे यांनी केला. रुग्णालयातील निवासी डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नांकडे शिवसेना दुर्लक्ष करणार नसून सिव्हिल सर्जन तसेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------