YEO26B26556
येवला : वंचित नागरिकांना रेशन कार्ड व शासकीय योजना लाभाचे वितरण करताना आमदार पंकज भुजबळ व पदाधिकारी
----------
पात्र लाभार्थींना योजनांचे लाभ मिळवून द्या
पंकज भुजबळ ः आढावा बैठकीत वंचित नागरिकांना शिधापत्रिका वितरण
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.२ ः मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येथील शिधापत्रिकांपासून वंचित असलेल्या पात्र कुटुंबांना त्याचे वितरण करण्यात आले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन आमदार पंकज भुजबळ यांनी यावेळी केले.
आमदार पंकज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका तसेच विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, वीज, नागरी सुविधा, शासकीय योजना तसेच विविध विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित विकासकामे आणखी रखडू नयेत, त्यातील अडचणी तातडीने दूर करून कामांना गती द्यावी अशा सूचना आमदार भुजबळांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांच्या विविध समस्या व प्रश्न जाणून घेण्यात आली. नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या अनावश्यक फेऱ्या माराव्या लागू नयेत, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, सभापती वसंतराव पवार, साहेबराव मढवई, जलसिंचन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्ता निकम, भुजबळांचे ओएसडी हरिश भामरे, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
----------------