पान तीन सेकंड मेन
-----------------
26577
सायगाव : पाण्याअभावी करपलेली पिके.
दरसवाडी–डोंगरगाव कालव्यातून पूर्व भाग कोरडाच..!
पाणीवाटपाच्या नियोजनाअभावी शेतकरी संतप्त; पाणी देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
येवला,ता.४ : मांजरपाडातून आलेले पाणी दरसवाडी - डोंगरगाव कालव्यातून सोडण्यात आले होते. मात्र पूर्व भागातील दुष्काळी सायगाव परिसराला हे पाणी मिळालेच नसल्याने आता शेतकरी संतप्त झालेत. योग्य नियोजनाअभावी ही वेळ आली असून दुष्काळात दिलासा देण्यासाठी आमच्या भागाला आता प्राधान्याने पाणी द्या अशी मागणी होत आहे.
डोंगरगाव कालव्याला सोडलेले पाणी आता बंद झाले असताना पूर्व भागातील शेवटच्या लाभक्षेत्रातील अनेक शेतकरी पाण्यापासून वंचितच राहिल्याने संताप व्यक्त होत आहे. कालवा सुरू असतानाही अपेक्षित पाणी मिळाले नाही आणि आता पाणी बंद झाल्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांसमोर आता पाणी कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. कालव्याला २२ दिवस पाणी सुरू असताना त्याचे नियोजनबद्ध आणि टप्प्याटप्प्याने वाटप झाले असते तर शेवटच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही पाणी मिळाले असते मात्र वरच्या भागात पाणी अडवले जाणे, विविध ठिकाणी पाण्याचा उपसा आणि पाणीवाटपाच्या नियोजनातील त्रुटी यामुळे पूर्व भागापर्यंत पाणी पोहोचले नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
सायगाव, वाईबोथी, गारखेडा, अंगुलगाव कौटखेडा, तळवाडे, डोंगरगाव या गावांना पाण्याचा एक थेंबही मिळालेला नसल्याने हंगाम हातातून जाणार असल्याचेही शेतकऱ्यांनी म्हटले आहेत.
-------
दरसवाडी–डोंगरगाव पाटाला पाणी सोडले. मात्र योग्य नियोजनाअभावी पूर्व भागातील शेवटच्या लाभक्षेत्रापर्यंत पुरेसे पाणी पोहोचले नाही. आता पाटही बंद झाला आहे. त्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांनी पाणी कधी आणि कुठून घ्यायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आश्वासनांपेक्षा पूर्व भागाला हक्काचे पाणी मिळेपर्यंत आमचा लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच राहील.
-योगेश दारुटे, आंदोलक, सायगाव
दुष्काळात लाभ क्षेत्रातील विशिष्ट भागाला पाणी मिळाले. मात्र शेवटच्या भाग वंचित राहिल्याने दुष्काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नियोजना अभावी हा विस्कळीतपणा झाला असून आमच्या भागावर अन्याय झाला आहे.
- गजानन भालेराव, सायगाव
मांजरपाडा प्रकल्पाच्या पूर्व भागातील शेवटच्या लाभक्षेत्रातील शेतकरी अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. वरच्या भागातील बंधारे भरले मग आमच्या शेतापर्यंत पाणी का नाही? प्रशासनाने उर्वरित पाण्याचे तातडीने नियोजन करून आमच्या हक्काचे पाणी द्यावे.
- नवनाथ उशीर, सायगाव