दहीहंडी नव्हे,पांडववाडी शाळेत पुस्तक हंडी..! शैक्षणिक साहित्याच्या हंडीतून विद्यार्थ्यांचा ज्ञानजागर

दहीहंडी नव्हे,पांडववाडी शाळेत पुस्तक हंडी..!  शैक्षणिक साहित्याच्या हंडीतून विद्यार्थ्यांचा ज्ञानजागर
Published on
पान-३ अँकर फोटो-26604 पांडववाडी : जिल्हा परिषदेच्या शाळेत पुस्तक हंडी फोडतांना विद्यार्थी व शिक्षक. पांडववाडी शाळेत पुस्तक हंडी...! शैक्षणिक साहित्याच्या हंडीतून विद्यार्थ्यांचा ज्ञानजागर सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ६ : सण आणि संस्कृतीला शिक्षणाची आणि आनंदाची जोड देत पांडववाडी (कुसमाडी) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अनोखी पुस्तक आणि शैक्षणिक साहित्य हंडी साजरी करण्यात आली. गोपाळकाला आणि शिक्षक दिनानिमित्त झालेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांसह संपूर्ण गावाचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हंडी फोडण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यांच्या आकलनशक्तीला चालना मिळावी, या उद्देशाने शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. हंडीसाठी दोरीने वेगवेगळ्या पुस्तकांच्या माळा तयार करण्यात आल्या होत्या. ही आकर्षक हंडी फुलांनी आणि पुस्तकांनी सजवण्यात आली होती. हंडीत होते ज्ञानाचे आणि मनोरंजनाचे धडे.. या हंडीत दह्या-दुधाऐवजी शिक्षकांनी तयार केलेल्या विशेष चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. यात इंग्रजी कृती, गीतगायन, शब्दकोडी, विरुद्धार्थी व समानार्थी शब्द, भाषण, नृत्य, सुविचार, सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न, तसेच प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज काढणे अशा विविध ज्ञानवर्धक कृतींचा समावेश होता. राधा आणि कृष्णाची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी तीन थर रचत ही ‘पुस्तक हंडी’ फोडली. हंडी फुटताच त्यातून पडणाऱ्या चिठ्ठ्या मिळवण्यासाठी मुलांची एकच झुंबड उडाली. ज्याच्या हाती जी चिठ्ठी येईल, त्याने ती कृती करायची आणि प्रश्नाचे उत्तर द्यायचे, असा गमतीदार नियम असल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या वेळी शाळेतील मुले राधा, कृष्ण आणि मीरा यांच्या वेशभूषेत आल्याने संपूर्ण शाळा परिसर ‘गोकुळ’ झाला होता. मुलांनी कविता गायन आणि नृत्याच्या तालावर या उत्सवाचा आनंद घेतला. मुख्याध्यापक बालाजी नाईकवाडी यांनी ही अभिनव संकल्पना मांडली. शिक्षक चंद्रभान पवार यांनी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com