पान-३ मेन
फोटो- 26609
बाभूळगाव : तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटप्रसंगी आमदार किशोर दराडे, क्रीडा समनव्यक नवनाथ उंडे, प्राचार्य गोरख येवले आदी.
‘कबड्डी-कबड्डी’च्या दमदार आवाजाने मैदान दणाणले
येवला तालुकास्तरीय स्पर्धेतून सहा संघ जिल्हास्तरावर, आमदार दराडेंच्या हस्ते उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ६ : ‘कबड्डी-कबड्डी’चा दमदार आवाज तसेच चढाई-प्रतिचढाईने रंगत वाढली आणि प्रत्येक गुणासाठी खेळाडूंनी जिवाचे रान केले. आक्रमक चढाया, भक्कम पकडी आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या डावपेचांमुळे कबड्डीच्या सामन्यात चांगलाच थरार निर्माण झाला... निमित्त होते, ते तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे...! यातून मुलांच्या तीन व मुलींच्या तीन अशी सहा संघांची जिल्हास्तरावर निवड झाली. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे झालेल्या या शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा जगदंबा एज्युकेशन सोसायटीच्या बाभूळगाव येथील एसएसएम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडल्या.
.............
स्पर्धेचे उद्घाटन शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नाणेफेक करून झाले. दोनदिवसीय स्पर्धेत तालुक्यातील तब्बल ९० संघांनी सहभाग नोंदविला. तालुका क्रीडा समन्वयक नवनाथ उंडे यांनी आयोजनाची भूमिका विशद केली. मैदानावर घाम गाळणारा विद्यार्थीच जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याची ताकद मिळवतो, असे मार्गदर्शन या वेळी आमदार दराडे यांनी केले.
दोनदिवसीय स्पर्धेमध्ये मुलांचे ६१ संघ, तर मुलींचे २९ संघ व एक हजार ८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. १४ वयोगटात स्वामी विवेकानंद विद्यालय, एरंडगाव मुलांचा संघ व होरायझन ॲकॅडमी येवला मुलींचा संघ विजयी झाला.
१७ वयोगटात जनता विद्यालय जळगाव नेऊर मुलांचा संघ व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय सोमठाण देश मुलींचा संघ,
तर १९ वयोगटात एन्झोकेम ज्युनिअर कॉलेज येवला मुलांचा संघ व माध्यमिक विद्यालय राजापूर मुलींचा संघ विजयी झाले. त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली. प्रथम व द्वितीय आलेल्या संघांना आमदार दराडे यांच्यातर्फे ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
प्राचार्य जी. एस. येवले, उपप्राचार्य ए. जी. कदम, विभागप्रमुख व्ही. आर. परदेशी, किरण पैठणकर, दत्तात्रय खोकले, क्रीडाशिक्षक सागर मुटेकर आदींसह शिक्षकांनी नियोजन केले.
पंच म्हणून पंचप्रमुख संदीप कापसे, पंच रिजवान शेख, विजय क्षीरसागर, रोहन लोणारी, नीरज शेख, अमोल राजगुरू, तीर्थराज गोराणे, सागर मुटेकर, फरिद शेख, राहुल येवले, श्याम शिंदे, राहुल बरकले, केशव वाकडे, संचित कानडे, उज्ज्वल पुराणिक, सागर कोकाटे, साई बाकळे, आकाश आहेर, दीपक देशमुख यांनी काम पाहिले. प्रदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
............
कोट
जिंकणारा संघ निश्चितच अभिनंदनास पात्र असतो; पण मैदानावर पूर्ण क्षमतेने, शिस्तीने आणि खिलाडूवृत्तीने खेळणारा प्रत्येक खेळाडू हा खऱ्या अर्थाने विजेता आहे. या स्पर्धेतून येवला तालुक्यातील उत्कृष्ट खेळाडू घडावेत आणि त्यांनी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवर तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे.
- किशोर दराडे, आमदार