पान चार
-------------------
26646
येवला : शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक डी. एस.स्वामी. समवेत अधिकारी व पदाधिकारी.
उत्सवाची परंपरा जपा, कायद्याची मर्यादाही पाळा!
पोलिस अधीक्षक डॉ. स्वामी : येवल्यात शांतता समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ९ : गणेशोत्सव हा उत्साहाचा आणि भक्तीचा सण असून येथे गणेश उत्सवाची मोठी परंपरा आहे.त्या परंपरेचे जतन करून एकोप्याने व शांततेत हा उत्सव साजरा करा.कायदेशीर मर्यादांचे पालन करून शांतता व सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिक आणि पोलिसांमधील संवाद अधिक दृढ व्हावा, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथे डॉ. स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (ता.९) येवल्यात शांतता समितीची बैठक झाली.त्यावेळी गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपविभागीय अधिकारी रोशन पंडित, योगेश मस्के, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, शहर पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, तालुका निरीक्षक किरण शिंदे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ उपस्थित होते.
दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही त्याच उत्साहात मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या चौकटीत उत्सव साजरा करावा, असे आवाहन डॉ. स्वामी यांनी केले. मिरवणुकीचे मार्ग, ये-जा करण्याची पद्धत, देखावे व आरास याबाबत पोलिसांकडून वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. हिंदू मुस्लिम ऐक्य जपत मिरवणुकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे नगरसेवक एजाज शेख यांनी सांगितले.
या वेळी माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, किशोर सोनवणे, शैलेश भावसार, अमोल शिंदे, प्रमोद सस्कर, दीपक पाटोदकर, अविनाश कुक्कर, मीननाथ पवार, अल्केश कासलीवाल, योगेश सोनवणे, ए.ए. शेख, बंडू क्षीरसागर,दादाभाई फिटर,अतुल घटे, गौरव कांबळे आदीसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ.भूषण शिणकर यांनी सूत्रसंचालन तर पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी आभार मानले.
------------
बैठकीत आवश्यक सूचना
- मंडळांनी मंडप, देखाव्याच्या ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत.
- गर्दीचे व्यवस्थापन, अनुचित प्रकारांना आळा घाला.
- सोशलमीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका.
- उत्सवाच्या माध्यमातून समाजात सलोखा, बंधुभाव ठेवा.
- सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा.