३८ गाव योजनेला सौरऊर्जा प्रकल्प मंजूर
३०० किलोवॉट क्षमतावाढ, जिल्हा वार्षिक योजनेतून साडेतीन कोटी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. १२ : तालुक्यातील ५५ गावांसह १३ संस्थांना नळाद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या येवला ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या वीजखर्चाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीन कोटी ४० लाखांच्या निधीतून अधिकचा ३०० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने मंजुरी देत प्रशासकीय मान्यता दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा निधी मिळाला आहे. तालुक्यातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेच्या कार्यान्वयासाठी दर महिन्याला मोठ्या प्रमाणात वीज आवश्यक असल्याने वीज खर्च हा महत्त्वाचा आर्थिक भार ठरत होता. हा खर्च कमी करून पाणीपुरवठा योजना सक्षम व शाश्वत करण्यासाठी सौरउर्जेचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. या योजनेसाठी यापूर्वीच २६८ किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यरत आहे. आता नव्याने ३०० किलवॉट क्षमतेच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने दोन्ही प्रकल्पांची एकत्रित क्षमता ५६८ किलोवॉट इतकी होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या वीज गरजेचा मोठा भाग सौरऊर्जेतून भागविणे शक्य होणार असून, वीजखर्चात मोठी बचत होण्यास मदत होणार आहे.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पात अद्ययावत व अधिक क्षमतेच्या सौर प्लेट्सचा वापर करण्यात येणार आहे. कमीत कमी जागेत अधिक क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी रिमोट मॉनिटरिंग सिस्टिम देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे.
प्रस्तावित ३०० किलोवॉट ऑन-ग्रिड सौरऊर्जा प्रणालीतून दररोज सरासरी १,१०० ते १,४०० युनिट, तर दर महिन्याला सरासरी ४० हजार युनिट वीजनिर्मिती अपेक्षित आहे. या वीजनिर्मितीमुळे पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलात बचत होऊन भविष्यातील आर्थिक भार कमी होणार आहे. कमी खर्चात आणि सौरउर्जेचा प्रभावी वापर करून यशस्वीपणे राबविली जाणारी ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राज्यातील इतर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी पथदर्शी ठरली आहे.