पान तीन
------------------
बाभूळगावच्या स्मशानभूमीचा
प्रश्न मार्गी; २० लाखांचा निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. १५ : तालुक्यातील बाभूळगाव बुद्रुक येथील स्मशानभूमीच्या दुरवस्थेचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. स्मशानभूमीच्या दुरुस्ती व विकासकामांसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे.
मागील आठवड्यात बाभूळगाव येथील स्मशानभूमीत एका महिलेवर अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. स्मशानभूमीच्या शेडचा स्लॅब तुटलेल्या अवस्थेत असल्याने पावसाचे पाणी थेट मृतदेहावर पडत होते.अंत्यविधीच्या प्रसंगी उपस्थित नातेवाईक व ग्रामस्थांवर मृतदेहाचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी पत्रे धरून उभे राहण्याची दुर्दैवी वेळ आली होती. या घटनेचा व्हिडिओ व वृत्त माध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्यानंतर बाभूळगावच्या स्मशानभूमीची दुरवस्था ऐरणीवर आली.
स्मशानभूमीसारख्या अत्यावश्यक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. पावसाळ्यात अंत्यविधी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने स्मशानभूमीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती.
स्मशानभूमीची समस्या सोडविण्यासाठी भुजबळांकडे यासाठी निधीची मागणी केली होती. याबाबत डीपीडीसीकडे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर स्मशानभूमीच्या दुरुस्ती व विकासासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता स्मशानभूमीच्या आवश्यक दुरुस्तीची कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यविधीच्या वेळी निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्याची अपेक्षा आहे. या प्रश्नासाठी पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थ व भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले आहेत.