YEO26B26737
अंदरसूल : येथील भागवत कुटुंबीयांनी साकारलेला कांदा समस्येचा देखावा.
----------------
देखाव्यातून मांडली
कांदा उत्पादकांची व्यथा
भागवत कुटुंबीयांकडून अनोखी आरास
--------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१५ : कधी भावाच्या आशेने डोळे बाजारभावाच्या फलकाकडे तर कधी पडलेल्या दराने डोळ्यांत पाणी... कांदा पिकवताना बळीराज्याच्या वाट्याला येणारी हीच उपेक्षा गणरायाच्या चरणी मांडण्यात आली आहे. अंदरसूल येथील डॉ. तुषार भागवत व डॉ. शीतल भागवत दांपत्याने कांदा उत्पादकांच्या व्यथांना आपल्या अनोख्या देखाव्यातून बोलके केले आहे. ‘बळीराजाच्या घामाला कष्टाचे मोल आणि शेतीमालाला योग्य भाव मिळू दे,’ अशी साद गणरायाला घातली आहे.
कांद्याचे भाव वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसतो आणि उत्पादन मुबलक झाले की भाव गडगडतात... कांदा उत्पादकांच्या या कायमच्या कोंडीतून निर्माण झालेली व्यथा थेट गणरायाच्या चरणी मांडत अंदरसूल येथील भागवत कुटुंबीयांनी यंदाच्या गणेशोत्सवात सामाजिक आशयाचा आगळावेगळा देखावा साकारला आहे. कांद्याच्या दरातील चढ-उतार, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील अडचणी यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला येणारी आर्थिक कोंडी या देखाव्यात प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या भावना मांडणारा हा देखावा सध्या चर्चेत आहे.
-------------
कोट
कांद्याचे उत्पादन जास्त झाले, की कांद्याचे भाव पडतात आणि भाव वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे कांदा संपलेला असतो. देखाव्यातून शेतीमालाला योग्य भाव मिळू दे, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे.
- डॉ. शीतल भागवत, अंदरसूल
---------------