फोटो- 26778, 26779
येवला : गावात टँकर आला, की पाणी भरण्यासाठी अशी गर्दी होते. दुसऱ्या छायाचित्रात महिलांना पाण्यासाठी अशी पायपीट करावी लागत आहे.
येवल्यात सप्टेंबरच्या मध्यावरही जलस्त्रोत कोरडेच
२३ गाव-वाड्यांची तहान भागते टँकरवर, काही गावांना अजूनही हवेत टँकर
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. २० : पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले असून, सप्टेंबरमध्येही २३ गाव-वाड्यांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आजमितीस १०-१२ गावांना टँकरची गरज असेल, अशी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असून, महिलांची पाण्यासाठीची भटकंती वाढली आहे.
मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या या तालुक्यात यंदा पावसाची स्थिती सुरुवातीपासूनच चिंताजनक राहिली.
.................
विशेषतः तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने जलस्रोतांवरील ताण वाढला आहे. पावसाळा संपत असतानाही विहिरी, कूपनलिका आणि जलस्रोत कोरडेच असल्याने अनेक गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तालुक्यातील पांजरवाडी, सायगाव, भुलेगाव, देवठाण, रेंडाळे, खामगाव, गवंडगाव, पिंपळखुटे, कोळम, अंकाई, गोरखनगर, आहेरवाडी, चांदगाव, नायगव्हाण, खैरगव्हाण, धनकवाडी, कासारखेडे, तांदूळवाडी, अनकाईचे वसंतनगर, कोळस टेकळी, आडसुरेगाव, सावरगाव अंतर्गत संभाजीनगर, नगरसूल अंतर्गत महालगाव, कोतकर, येवले, जाधव, मनगडे वस्ती, मुळवाईघाट, कटक वस्ती, कापसे वस्ती, माळवाडी, रावते वस्ती, शेळके वस्ती, फरताळेवाडी, डोंगर वस्ती, माळमळा, चिखलेवाडी, विलास खैरनार वस्ती, दादमळा, सोनवणे वस्ती, पहाडे वस्ती येथे पाणीटंचाईची तीव्रता जाणवत आहे. १२ गावे व २३ वाड्यांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
रोज टँकरच्या १८ खेपा होत असून, शहरातील नांदूर विहिरीवरून टँकर भरावे लागत आहेत. अद्यापही पाणी नसल्याने टंचाई वाढत असून, १०-१२ गावांसाठी टँकर सुरू करण्याची मागणी आहे. गावात पाणीच उपलब्ध नसल्याने टँकर येण्याची वेळ निश्चित असली तरी पाण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
.............
चौकट
टँकर सुरू करण्याची मागणी
सप्टेंबरमध्येच टँकर सुरू करण्याची वेळ आली असल्याने आगामी काळातील पाणी स्थितीबाबत चिंता वाढली आहे. पाणीटंचाई, पिकांची दुरवस्था आणि जनावरांसमोरील पाण्याचे संकट लक्षात घेता शासनाने तालुक्याची वस्तुनिष्ठ पाहणी करावी, पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त जाहीर करावा, टँकरच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.
..........