‘ज्या घरी शौचालय, त्याच घरी सौभाग्य!’
चांदवडच्या इंद्रायणी जनहित मंचाचा अभिनव उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
चांदवड, ता. २५ : ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य, स्वच्छता आणि सन्मान यांना प्राधान्य देत चांदवड येथील इंद्रायणी जनहित मंचाने ‘ज्या घरी शौचालय, त्याच घरी सौभाग्य!’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी जनजागृती करत महिलांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांमध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिलांना आजही विविध अडचणींचा सामना करावा लागतो. उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आल्याने महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. तसेच महिलांच्या सुरक्षिततेचा आणि प्रतिष्ठेचाही प्रश्न ऐरणीवर येतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी इंद्रायणी जनहित मंचाने स्वच्छतेला सामाजिक चळवळीचे स्वरूप देण्याचा संकल्प केला आहे.
घरामध्ये शौचालय असणे ही केवळ सुविधा नसून महिलांच्या आरोग्याशी, सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी निगडित बाब आहे. घरात शौचालय असल्यास महिलांना उघड्यावर जाण्याची वेळ येत नाही. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या कमी होण्यास मदत होते. याच विचारातून मंचाने ग्रामीण भागातील कुटुंबांना घरामध्ये शौचालय उभारण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशभरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली आहे.
केवळ शौचालय बांधणे पुरेसे नसून त्याचा नियमित वापर होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजविण्याचा प्रयत्न उपक्रमातून सुरु आहे. इंद्रायणी जनहित मंचाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे. शौचालयाचा वापर, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यावर भर दिला जात आहे.