टोमॅटो व्यापाऱ्याला १०.९२ लाखांचा गंडा
चौघांविरुद्ध गुन्हा ः १५.८४ लाखांचा टोमॅटो व्यवहार; केवळ ४ लाख ९२ हजार दिले
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.३ ः टोमॅटो खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्याची तब्बल १० लाख ९२ हजार ५४ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात नारायणगाव येथील टोमॅटो व्यापाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल राजकुमार अंभोरे (४६, रा. सिद्धार्थनगर, पिंपळगाव बसवंत) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अंभोरे यांचा पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.
----------
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अंभोरे यांचा दत्तात्रय शिंगोटे (रा. नारायणगाव, जि. पुणे) यांच्यासोबत टोमॅटो खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला. शिंगोटे यांच्याकडे काम करणारे सागर काकड (रा. संगमनेर) व विशाल नावाचा युवक यांनी या व्यवहारात मदत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सियाराम शर्मा (रा. नाशिक) यांच्या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून खरेदी केलेला टोमॅटो जयपूर येथे पाठविण्यात आल्याचे पोलिस नोंदीत म्हटले आहे.
या व्यवहाराची एकूण रक्कम १५ लाख ८४ हजार ५३ रुपये होती. त्यापैकी अंभोरे यांना ४ लाख ९२ हजार रुपये देण्यात आले. मात्र, उर्वरित १० लाख ९२ हजार ५४ रुपये देण्याची मागणी केल्यानंतर संबंधितांकडून ‘आज देतो, उद्या देतो’ अशी उत्तरे देत रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने अखेर अंभोरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
-----------