धुळे टुडे ३ साठी मेन...
---
फोटो- NSK26H31615
धुळे : ‘विकसित भारत संकल्प’ अभियानांतर्गत काढलेल्या मशाल मोर्चात सहभागी मंत्री जयकुमार रावल, अनुप अग्रवाल, राम भदाणे, मायादेवी परदेशी व भाजपचे पदाधिकारी.
---
विकसित भारतासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे
---
पालकमंत्री रावल; विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत धुळ्यात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ७ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासूनच २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रत्येकाने आपले गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देशाच्या जडणघडणीसाठी यथार्थ योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी येथे केले.
सरकारप्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत बुधवारी (ता.७) पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीत केलेल्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम सकाळी शहरातील मालेगाव रोडवरील आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात झाला, त्यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते. आमदार अग्रवाल, आमदार राम भदाणे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, महापौर मायादेवी परदेशी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, कल्पना महाले, प्रतिभा चौधरी यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पक्षाचे धुळे महानगर व धुळे ग्रामीणचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. रावल म्हणाले, की तब्बल २५ वर्षांपूर्वी म्हणजे ७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वरूपात सरकारचे प्रमुख म्हणून राज्याची सूत्रे स्वीकारली. तेव्हापासून आजपर्यंत गुजरातचे सलग तीन वेळा मुख्यमंत्री आणि त्यानंतर २०१४ पासून आजअखेर देशाचे पंतप्रधान म्हणून ते धुरा वाहत आहेत. यामध्ये सुरवातीला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा केलेला विकास सर्वांसाठी अनुकरणीय राहिला आहे. त्यानंतर गेली १२ वर्षे सलग तीनवेळा पंतप्रधान म्हणून काम करताना श्री. मोदी यांच्या कार्यकाळात भारताने प्रगतीच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. आज भारत अनक क्षेत्रात आत्मनिर्भरतेने वावरत आहे. १४० कोटी देशवासीयांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी पंतप्रधान मोदी दिवस-रात्र झटत आहेत. त्यांच्या कार्याचे, मेहनतीचे अनुकरण करण्याची आपल्या प्रत्येकावर जबाबदारी आहे.
मशाल यात्रा
या कार्यक्रमानंतर देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी पालकमंत्री रावल यांच्या नेतृत्वात आमदार अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत मशाल यात्रा काढण्यात आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
---