पान तीन
---------------
05130
लखमापूर : त्रिपक्षीय करार प्रसंगी उपस्थित विकास पानसरे,रवींद्र पवार, प्रमोद राजेभोसले, सुरेश नखाते आदी.
महाराष्ट्रात पर्यटन, ग्रामीण विकासाला नवी चालना
पर्यटन संचालनालय, सह्याद्री फार्म्स, ''टाटा स्ट्राइव्ह'' यांच्यात त्रिपक्षीय करार
सकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता. ४ : महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास, ग्रामीण भागातील युवकांसाठी शाश्वत रोजगार व उद्योजकता निर्मिती, तसेच कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन संचालनालय, सह्याद्री रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (सह्याद्री फार्म्स) आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह्स ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारामुळे राज्यातील पर्यटन आणि कौशल्य विकास क्षेत्राला नवीन चालना मिळणार आहे.
या करारांतर्गत सर्व सहभागी संस्थांनी एकत्रितपणे महाराष्ट्राच्या समृद्ध कृषी क्षेत्राचा, ग्रामीण समुदायांचा, सांस्कृतिक वारशाचा आणि तीर्थक्षेत्रांचा पर्यटन विकासासाठी पुरेपूर वापर करण्याचा संकल्प केला आहे. याद्वारे हॉस्पिटॅलिटी आणि गेस्ट सर्व्हिसेस, फूड ॲण्ड बेव्हरेज, हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस, टुरिझम फॅसिलिटेशन तसेच कस्टमर सर्व्हिस यांसारख्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या कराराप्रसंगी पर्यटन संचालक विकास पानसरे, रवींद्र पवार, सह्याद्री फार्म्सचे प्रमोद राजेभोसले, सुरेश नखाते आणि टाटा स्ट्राइव्हचे शिलादित्य समादार आणि संतोष डोंगरे उपस्थित होते.
----------
मोहाडीसह पवना धरण परिसरात मॉडेल क्लस्टर विकास
पर्यटन धोरण २०२४ मधील ''महा स्पेशल डेस्टिनेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत मॉडेल कृषी आणि ग्रामीण पर्यटन क्लस्टर विकसित करण्यावर या करारात विशेष भर देण्यात आला आहे. दिंडोरी येथील सह्याद्री मोहाडी क्लस्टरचा यामध्ये समावेश असून, जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने १६ गावांमध्ये एकात्मिक ग्रामीण व कृषी-पर्यटन परिसंस्थेचा विकास केला जात आहे. पुण्यातील पवना धरण क्लस्टरमध्येही शेतकरी-नेतृत्वाखालील कृषी-पर्यटन, ग्रामीण पर्यटन आणि आतिथ्य उद्योजकता संधी शोधल्या जाणार आहेत.
--------
कुंभमेळा आणि कौशल्य प्रशिक्षण
आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या लाखो भाविक व पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या आतिथ्य सेवा पुरवण्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मानवी संसाधन तयार करण्याचे महत्त्वाचे काम या उपक्रमांतर्गत केले जाणार आहे. याशिवाय शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, ग्रामीण युवक, महिला आणि होतकरू कृषी-पर्यटन उद्योजकांसाठी व्यवसाय नियोजन, आदरातिथ्य आणि डिजिटल प्रचाराचे विशेष प्रशिक्षण आयोजित केले जाईल. हा महत्त्वपूर्ण करार स्वाक्षरीच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार असून, याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यासोबतच राज्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे.