
नाशिक : ‘अभिजात मराठी’साठीची चळवळ बनली ‘लाख’मोलाची..!
नाशिक : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी एकीकडे राजकीय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. तर दुसरीकडे मराठी भाषेचा इतिहास पोचविताना जनसामान्यांमध्ये चळवळ उभी केली जात आहे. पोस्टकार्ड, डिजिटल स्वाक्षरी मोहिमेसमवेत ‘शांतता! मराठीचं कोर्ट चालू आहे’ या माहितीपटातून जनजागृती सुरू आहे. या सर्व मोहिमांना प्रत्येकी एक लाखापर्यंत पाठबळ, सहकार्य मिळाले असल्याने खऱ्या अर्थाने चळवळ लाखमोलाची बनली आहे.
मराठी साहित्य संमेलनावेळी नाशिकमध्ये झाला होता प्रारंभ
कुसुमाग्रजनगरी, नाशिकमध्ये नुकतेच ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (marathi sahitya sammelan) झाले. या संमेलनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, जनजागृती व्हावी, यादृष्टीने वेगवेगळ्या मोहिमा सुरू करण्यात आल्या होत्या. त्यापैकीच एक म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी क्यूआर कोड स्कॅन डिजिटल स्वाक्षऱ्या संकलित करताना जनआंदोलन उभारण्यास सुरवात झाली होती. संमेलनादरम्यान सुमारे १६ हजार नागरिकांनी डिजिटल स्वाक्षऱ्यांद्वारे समर्थन दिले होते. सध्या स्वाक्षऱ्या झालेल्यांची संख्या एक लाखापर्यंत पोचली आहे.
हेही वाचा: मराठी भाषा गौरव दिन : सोशल मीडियावर लिहणाऱ्या तरुणांचे मनोगत
बचतगटांतील महिलांकडून दोन लाख पत्रे संकलित
राष्ट्रपतींच्या नावाने राज्यभरातून पत्र (पोस्टकार्ड) संकलित केले जात आहेत. समाजातील वेगवेगळ्या घटकांकडून पत्रावर संदेश लिहित राष्ट्रपतींना विनंती केली जात आहे. महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात बचतगटाशी संलग्न महिलांकडून सुमारे दोन लाख पत्रे संकलित केली आहेत.
समाज माध्यमांवर मिळतेय पसंती
मराठी भाषेच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकण्यासह ‘शांतता! मराठीचं कोर्ट चालू आहे’ हा माहितीपट जनजागृतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. संमेलनानिमित्त प्रदर्शित केलेला हा माहितीपटदेखील सुमारे एक लाखाहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. समाज माध्यमांवर या माहितीपटाला चांगली पसंती मिळत असून, इतरांपर्यंत पोचविण्यासाठी अधिकाधिक व्यक्तींकडून माहितीपटाचा तपशील पुढे पाठविला जात आहे.
हेही वाचा: ‘मराठी ॲप’ने मराठी संवर्धनाचे पाऊल पुढे...
''मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी सहा वर्षांत जितके काम झाले असेल, त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक काम वर्षभराच्या कालावधीत झाले आहे. जनआंदोलन उभारतानाच मराठीविषयी सर्वसामान्यांपर्यंत माहितीपटातून उपयुक्त माहिती पोचविली जात आहे. पत्र, डिजिटल स्वाक्षरीतून मोठा जनरेटा उभा राहिला आहे.'' -प्रा. डॉ. हरी नरके, सदस्य, अभिजात मराठी भाषा समिती
Web Title: Towards The Success Of Abhijat Marathi Movement
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..