
Nashik Crime News : निर्यातीच्या बहाण्याने व्यापाऱ्याला गंडा; मुंबईच्या बापलेकांकडून 80 लाखांची फसवणूक
इगतपुरी (जि. नाशिक) : तांदळासह विविध वस्तूंचे परदेशात भाव वाढले आहेत. त्यामुळे तांदूळ, मैदा आदी साहित्य निर्यात केल्यास मोठा नफा होईल असे आमिष दाखवून बोरिवली येथील दोघांनी घोटी येथील योगेश्वर राइस मिलचे संचालक माधव लक्ष्मण काळे (६३) यांची तब्बल ८० लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
श्री. काळे यांनी घोटी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार बोरिवली येथील जयेश भरत बर्मन व भरत बर्मन (रा. अनुराधा अपार्टमेंट, सहकार निकेतन, बोरिवली पश्चिम, मुंबई) यांनी वेळोवेळी काळे यांना दक्षिण आफ्रिकेत व परदेशात तांदळाचे भाव वाढले आहेत. (Trader cheated on the pretext of export 80 lakhs fraud by Baplekas of Mumbai Nashik Crime News)
फिर्यादीनुसार श्री. काळे यांना निर्यात केल्यास चांगला फायदा होऊ शकेल, त्यासाठी आम्ही मदत करू असे सांगून काळे यांचा विश्वास संपादन केला. निर्यातीचा परवाना काढण्यासाठी १२ ते १५ लाख रुपये लागतात, तो दहा लाखांत मिळवून देतो, असे सांगून जयेश बर्मन यांनी काळे यांना संत तुकाराम साखर कारखाना येथे नेऊन ३ लाख ११ हजार रुपये डीडीद्वारे भरून घेतले.
यापाठोपाठ आफ्रिकेमध्ये आटा व मैदा यांचेही भाव वाढले आहेत, अशी बतावणी केल्यामुळे काळे यांनी नाशिकरोडच्या मोठ्या व्यापाऱ्याकडून ४ लाख २३ हजार ७५० रुपये किमतीचा आटा व मैदा खरेदी केला.
मात्र यानंतर आरोपींनी या मैद्याची निर्यात केलीच नाही. त्यामुळे या किमतीचा भुर्दंड काळे यांना सहन करावा लागला. तांदूळ निर्यातीसाठी काळे यांनी आरोपींना २५ किलो वजनाची एक बॅग असा ११९ टन वजनाचा ३८ लाख ३७ हजार ४९७ रुपये किमतीचा तांदूळ पॅकिंग करून न्हावाशेवा बंदरात पाठवून दिला.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
या तांदळाचा वाहतूक खर्च म्हणून ७ लाख ५० हजार रुपये घेतले; पण हा तांदूळ त्यांनी आपणच घोटीच्या योगेश्वर राईसचे मालक व संचालक आहोत, असे भासवून काळे यांचा तांदूळ स्वत:च्या नावाने निर्यात करून आलेल्या रकमेचा अपहार केला. यासह विविध कारणांनी वेळोवेळी रोख व इतर माध्यमांतून आरोपींनी काळे यांची एकूण ७९ लाख २२ हजार २४७ रुपयांची फसवणूक केली आहे.
घोटी पोलिसांनी या प्रकरणी भरत बर्मन व जयेश बर्मन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला आहे.
परवान्याची चौकशी?
निर्यातीसाठी परवाना काढावा लागतो, तो मिळाला आहे किंवा नाही याची चौकशी करणे आवश्यक आहे. तो न काढताच संबंधिताने तांदळाची निर्यात कुणाच्या नावावर केली आणि ती रक्कम कशी वळती करून घेतली याचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये कळबळ उडाली आहे.