
अभोणा (जि. नाशिक) : दिवाळी हा अत्यंत महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो. परंतु, हाच दिवाळीचा सण आदिवासी समाजात अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा अजूनही कायम आहे. कळवणसारख्या आदिवासी बहूल तालुक्यातील कोकणा, भिल्ल, महादेव कोळी या जमातीचे आदिवासी बांधव दिवाळीची सुरवातच वाघबारशीने (वसुबारस) करतात. (tradition of Waghbarashi worship continues unique relationship maintained with wild animals by tribal community Nashik News)
बोरदैवत, देवळीवणी, चिंचोरे या तीन गावांच्या वेशीवर असलेल्या वाघदेवाच्या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून भव्य यात्रा भरते. वाघबारशीच्या दिवशी गुरे चारणारे गुराखी (बाळदी) नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगलात जातात. या दिवशी सर्व गुराखी उपवास करतात. दुपारी गावातील भगत व ग्रामस्थ वेशीवरील वाघदेवाजवळ जमा होतात. आदिवासी परंपरेनुसार प्रत्येक गावाच्या वेशीवर वाघदेवाच्या मूर्तीची दगडावर तथा चिऱ्यावर स्थापना केलेली आढळते. याला वाघदेवाचा ‘चिरा’ किंवा ‘पाटली’ असे संबोधले जाते.
या वाघदेवाच्या पाटलीवर, चिऱ्यावर चंद्र, सूर्य, नागदेव, वाघदेव, मोर आदी चित्रे कोरलेली असतात. वाघदेवाला शेतातील नवीन पीक म्हणजे नागली (कन्सरा) उडीद, भात आदी पिकांची कणसे वाहिली जातात. गावाच्या प्रथेनुसार तांदूळ, उडीदाच्या पूंजा टाकून पूजा केली जाते. जंगलातील रानदेव, डोंगऱ्यादेव, हिरवादेव, कन्सरा, गावदेवी, लक्ष्मी (गाय) या सर्वांची विधीवत पूजा केली जाते. आदिवासी व त्यांची गुरे कायम राना-वनात, जंगलात, काट्या- कूट्यात भटकत असतात.
त्यांना वन्य प्राण्यांपासून कोणत्याही प्रकारची ईजा होऊ नये, भक्ष बनू नये, आदिवासींच्या लक्ष्मीला म्हणजे गायीगुरांना व गुराख्याना सुख- शांती लाभावी, हा एकमेव हेतू या वाघदेवाच्या पूजेमागे असतो. वाघबारशीच्या दिवसापासून लक्ष्मीपूजनापर्यंत आदिवासी गुराखी रोज रात्री गावात व परिसरातील आदिवासी खेड्यात लक्ष्मीच्या नावाने ‘धिंडवळी’ मागतात. या पाच दिवसात लक्ष्मी गायीच्या रूपाने घरात येते, अशी श्रद्धा आहे.
दिवाळीच्या दिवसात वर्षभर काबाडकष्ट करून जमविलेल्या पैशातून नवीन कपडे खरेदी करतात. या हंगामात पावसावर अवलंबून असलेल्या भात, नागली, उडीद, कुळीद आदी पिकांच्या कापनीचे दिवस असल्याने आदिवासी अत्यंत आनंदात असतो. यावर्षी मात्र परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाल्याने यंदाची दिवाळी संकटात आहे.
"आमचा आदिवासी समाज निसर्गपूजक म्हणून ओळखला जातो. डोंगऱ्यादेव, होळी आणि दिवाळी हे आमच्या आदिवासींचे प्रमुख सण, उत्सव आहेत. आदिवासींचा प्रमुख व्यवसाय शेती व पशुपालनाचा आहे. त्यामुळे आमच्या गोठ्यातील गायी, शेळी, म्हशी हीच आमची खरी लक्ष्मी असून, तिचे जंगलातील वाघ व अन्य हिंस्र पशूंपासून सरंक्षण व्हावे, या मुख्य उद्देशाने वसुबारस तथा वाघबारस हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा करतात."
- डी. एम. गायकवाड, आदिवासी सेवक, अभोणा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.