ॲंकर
NSK26H31350
जळगाव : रोटरी वेस्टतर्फे आयोजित व्याख्यानात बोलताना भास्करराव पेरे पाटील.
–
इच्छाशक्ती असेल तर गाव, शहराचा विकास शक्य
(उपशीर्षक)
भास्करराव पेरे पाटील : जळगावात रोटरी वेस्टतर्फे जाहीर व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : कोणीही एक व्यक्ती नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्था या नागरिकांच्या सहभागातून त्यांच्या विचारांच्या पाठबळावर परिवर्तन घडवू शकतात. यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असून यातून गाव व शहराचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन पाटोदा गावाचे शिल्पकार व माजी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
रोटरी परिवार जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्यातर्फे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित ‘विचार बदलले ‘तर गाव बदलते’ या विषयावरील जाहीर व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी सहप्रांतपाल अनिल कांकरिया, अध्यक्ष योगेश राका, मानद सचिव बिपीन काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती.
पेरे- पाटील यांनी ‘गाव बदलायचं म्हणजे काय करायचं’ असा प्रश्न विचारून संवादाला सुरुवात केली. प्रत्येक व्यक्ती हा बोलण्याचा अर्थ कसा काढतो; यावर अवलंबून आहे. आज सरासरी आयुष्यमान कमी होत असून त्यास खराब पाणी, कमी झाडे, स्वच्छतेचा अभाव, शिक्षणाबरोबर संसाराकडे दुर्लक्ष, बाहेरचे अधिक खाणे, ज्येष्ठ मंडळींचा आदर न करणे ही कारणे आहेत, असे ते म्हणाले. नद्या स्वच्छच आहेत त्या घाण करू नका. ज्या प्रथा चांगल्या आहेत. त्या ठेवा व काहीमध्ये बदल करा. आज आपण ऑक्सिजन चोरून घेत आहोत. ६ लाख लोकसंख्या मागे २४ लाख झाडे पाहिजे. जिथे झाडे तिथे पाऊस असे समीकरण सांगून दुष्काळ म्हणजे नाटक असून ते आपल्या चुकांची शिक्षाच आहे.
प्रत्येक गावात जागा असते. वृक्षारोपणासाठी शासनाची योजना पण सारखीच असते. मात्र त्यासाठी इच्छाशक्ती हवी. मी २४ देशात जाऊन आलो. जग स्वच्छतेच्या बाबतीत खूप पुढे असून आपण खूप मागे आहोत, असेही ते म्हणाले. योगेश राका यांनी प्रास्ताविक केले. सरिता खाचणे यांनी सूत्रसंचालन केले. तर बिपिन काबरा यांनी आभार मानले.
चौकट
‘शेतकऱ्यांकडे लक्ष द्या’
‘हे करू नका’ असे फलक लावण्याऐवजी ‘इथे करा’ सांगणारे फलक लावणे गरजेचे आहे. शासन शेतकऱ्यांना त्यांच्या मरणानंतर मदत करते, त्याऐवजी जिवंतपणी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सैन्यातील जवान आणि ग्रामीण भागातील १७ तास काम करणारी महिला ही दोनच व्यक्ती देशात प्रामाणिक असल्याचे सांगत त्यांनी राजकारणी व अधिकाऱ्यांवर निशाणा साधला.