संघर्षातून शैक्षणिक विश्व उभारणारे दूरदृष्टीचे नेतृत्व: श्री. हरबीर चौधरी

संघर्षातून शैक्षणिक विश्व उभारणारे दूरदृष्टीचे नेतृत्व: श्री. हरबीर चौधरी
Published on: 
संघर्षातून शैक्षणिक विश्व उभारणारे दूरदृष्टीचे नेतृत्व : हरबीर चौधरी गुणवत्ता, शिस्त, मूल्याधिष्ठित शिक्षणातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा लीड जीवनात जेव्हा संघर्षाची वादळे उभी राहतात, तेव्हा दोनच मार्ग शिल्लक असतात, एकतर त्या वादळांपुढे हात टेकून शरण जाणे किंवा त्या वादळांवर मात करून स्वतःचे आणि समाजाचे भविष्य उजळवणारे दीपस्तंभ बनणे. नाशिकच्या शैक्षणिक पटलावर गुणवत्ता, शिस्त आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा भक्कम पाया रचणारे ‘गोल्डन डेज स्कूल’ समूहाचे संस्थापक हरबीर चौधरी हे अशाच दुसऱ्या मार्गाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबातील खडतर बालपणापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, भारतीय वायुसेनेतील कर्तव्यकठोर शिस्त आणि त्यानंतर हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे शैक्षणिक विश्व उभारण्यापर्यंतचा टप्पा अत्यंत प्रेरणादायी आणि थक्क करणारा आहे. -- उ त्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या हरबीर चौधरी यांचे आयुष्य सुरुवातीपासूनच खडतर परीक्षेचे राहिले. जन्मापूर्वीच पितृछत्र हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशा अत्यंत प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीत त्यांच्या मातोश्रींनी धैर्याने कुटुंबाची धुरा सांभाळली. गरिबी, सामाजिक अडचणी आणि संसाधनांचा अभाव या सगळ्यांमध्ये हरबीर यांचे बालपण घडले. ग्रामीण भागातील सरकारी शाळेत शिकत असतानाच त्यांना वयाच्या मानाने फार मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागल्या. शाळेतून वेळ मिळाला की सुटीच्या दिवसांत शेतात आईला मदत करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. कडक उन्हात शेतीकामात गाळलेला घाम, मातीशी जुळलेली नाळ आणि आईचे कष्ट डोळ्यांनी पाहताना त्यांच्या मनात कष्ट, शिस्त, जबाबदारी आणि जिद्द या मूल्यांची खोलवर पेरणी झाली. याच काळात त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत त्यांच्या भगिनी बलेश राणा आणि मेहुणे श्री. एस. पी. राणा (निवृत्त सहायक पोलिस आयुक्त, दिल्ली पोलिस) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संकटातही मान न झुकविता आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा त्यांना या कौटुंबिक आधारातून मिळाली. --- वायुसेनेतील शिस्तबद्ध, गौरवशाली कारकीर्द अत्यंत तरुण वयात मातृभूमीच्या सेवेचे उदात्त ध्येय उराशी बाळगून त्यांनी भारतीय वायुसेनेत प्रवेश मिळविला. हा टप्पा त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा संस्कारवर्ग ठरला. कर्नाटकातील बेळगाव येथील नामांकित एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये त्यांनी खडतर लष्करी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यानंतरच्या सेवाकाळात त्यांनी जैसलमेरच्या वाळवंटापासून ते महाराष्ट्रातील ओझर आणि उत्तर प्रदेशातील हिंडन यांसारख्या मोक्याच्या व संवेदनशील हवाई तळांवर कर्तव्य बजावले. वायुसेनेतील या प्रवासाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला परिपूर्ण आकार दिला. वेळेचे नियोजन, काटेकोर कार्यपद्धती आणि नियमांचे तंतोतंत पालन, कठीण परिस्थितीतही शांत राहून योग्य निर्णय घेण्याची क्षमता, वैयक्तिक यशापेक्षा संपूर्ण पथकाचे ध्येय महत्त्वाचे मानण्याची वृत्ती, देशासाठी आणि समाजासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना हे बाळकडू त्यांना या प्रवासातून मिळाले. वायुसेनेतील या अनुभवाने त्यांच्या मनात एक गोष्ट स्पष्ट केली होती, की माणसाला खरी ताकद ही केवळ त्याच्या पदावरून नव्हे, तर त्याच्या चारित्र्यातून आणि शिस्तीतून मिळते. हीच जीवनमूल्ये पुढील काळात त्यांच्या भव्य शैक्षणिक कार्याची भक्कम पायाभरणी ठरली. -- परिवर्तनाची नवी पहाट : १२ जानेवारी २०१२ सैन्यदलातील प्रदीर्घ सेवेनंतर आणि कृषी व उद्योजकीय क्षेत्रातील अनुभवांच्या बळावर त्यांनी आपल्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला. निवृत्तीनंतर केवळ शांत जीवन जगण्याऐवजी, देशाच्या भावी पिढीला घडविण्यासाठी काहीतरी ठोस कार्य करावे, या आंतरिक तळमळीतून त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला. १२ जानेवारी २०१२ ला स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी त्यांनी नाशिक जिल्ह्यात पहिल्या ‘गोल्डन डेज स्कूल’ची स्थापना केली. हा केवळ एका नव्या शाळेचा प्रारंभ नव्हता, तर नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात मूल्यांची नवी चळवळ सुरू करणारा ऐतिहासिक क्षण होता. त्यांच्या मते, शिक्षण म्हणजे केवळ चार भिंतींच्या आत मिळणारे पुस्तकी ज्ञान किंवा केवळ गुणपत्रिकेवरील टक्केवारी नव्हे, तर माणसाचे उत्तम चारित्र्य, देशप्रेम, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, प्रचंड आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करणारी ती एक अखंड जीवनप्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना केवळ नोकरी मिळविणारी यंत्रे न बनविता, त्यांना संवेदनशील आणि राष्ट्र उभारणीत योगदान देणारे जबाबदार नागरिक बनविणे, हाच त्यांचा मुख्य उद्देश राहिला. -- बारा शाखांचे विशाल शैक्षणिक विश्व सुरुवातीच्या काळात साधनसामग्रीची मर्यादा असतानाही हरबीर चौधरी यांनी गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. त्यांनी आधुनिक व नावीन्यपूर्ण अध्यापनपद्धती लांबविली. पारंपरिक पाठांतराऐवजी संकल्पना समजून घेण्यावर आणि प्रयोगांवर भर दिला. केवळ पदवीधर शिक्षक नव्हे, तर मुलांवर मायेने संस्कार करणारे शिक्षक घडविणे हे ध्येय ठेवले. सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला, संगीत, वक्तृत्व आणि लष्करी शिस्तीचे प्राथमिक संस्कार रुजविणे, तसेच शाळा आणि पालक यांच्यातील अतूट विश्वास हेच संस्थेचे सर्वांत मोठे भांडवल ठरले. या दूरदृष्टीमुळे नाशिककरांनी गोल्डन डेज स्कूलवर भरभरून विश्वास टाकला. एका छोट्या वास्तूपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका भव्य शैक्षणिक समूहात रूपांतरित झाला आहे. संस्थेच्या एकूण शाखा बारा शाखांचा विस्तार झाला असून, सहा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कर्मचारी वर्ग ६०० हून अधिक असून, समर्पित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि मूल्याधिष्ठित शिक्षण हेच प्रमुख ध्येय आहे. हा प्रचंड विस्तार केवळ संस्थेचा भौतिक वाढीचा आलेख दाखवत नाही; तर तो दाखवितो हजारो पालकांचा संस्थेवर असलेला अतूट विश्वास आणि हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळालेली दिशा. -- मूल्याधिष्ठित शिक्षणातून राष्ट्रनिर्मितीचा संकल्प हरबीर चौधरी यांच्यासाठी शिक्षण ही एक पवित्र सामाजिक बांधिलकी आहे. त्यांच्या मते, प्रत्येक मुलात एक अद्वितीय प्रतिभा दडलेली असते. गरज असते, ती केवळ एका संवेदनशील मार्गदर्शकाची, जो त्या सुप्त गुणांना ओळखून त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देईल. गोल्डन डेज स्कूल समूहात शिकणारा प्रत्येक विद्यार्थी केवळ अभ्यासात अव्वल ठरत नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा आदर करणारा, समाजाप्रति कृतज्ञ राहणारा आणि देशासाठी काहीतरी करून दाखखिण्याची जिद्द बाळगणारा बनतो. आज या शाळेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत यश संपादन करून संस्थेचा आणि नाशिकचा नावलौकिक वाढवत आहेत. संघर्षातून आत्मविश्वास, शिस्तीतून नेतृत्व आणि शिक्षणातून समाजपरिवर्तन या त्रिसूत्रीवर हरबीर चौधरी यांचे जीवनकार्य उभे आहे. वडिलांचे छत्र नसताना एका खेड्यातून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो कुटुंबांचे भविष्य घडविणाऱ्या वटवृक्षात रूपांतरित झाला आहे. निःस्वार्थ सेवा, अढळ ध्येयनिष्ठा आणि दूरदृष्टीच्या बळावर प्रतिकूलतेवर कशी मात करता येते, याचे श्री. हरबीर चौधरी हे चालतेबोलते प्रेरणास्थान आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com