महापालिकेकडून आर्थिक मदत

महापालिकेकडून आर्थिक मदत
Published on: 
झाड कोसळून जीवितहानी झाल्यास आता तातडीने मदत मानवीय दृष्टिकोनातून महापालिका देणार आर्थिक भरपाई; धोरणाला मंजुरी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : वादळ, मुसळधार पाऊस किंवा अन्य नैसर्गिक कारणांमुळे झाड उन्मळून पडून एखाद्या नागरिकाचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास आता नाशिक महापालिकेकडून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार आहे. यासंदर्भातील कायमस्वरूपी धोरण निश्चित करण्याच्या प्रस्तावाला महासभेने जादा विषयाद्वारे मंजुरी दिली आहे. शहराची वृक्षसंपदा मोठी आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून नियमितपणे वृक्ष छाटणी, धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि संवर्धनाची कामे केली जातात. तरीही मॉन्सूनमध्ये अचानक येणारे वादळी वारे, अतिवृष्टी, वीज कोसळणे यांसारख्या अनपेक्षित घटनांमध्ये मोठी झाडे किंवा त्यांच्या फांद्या रस्त्यावर, पदपथावर, सार्वजनिक ठिकाणी, वाहनांवर आणि कधी कधी थेट नागरिकांच्या अंगावर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटनांमध्ये मृत्यू झाल्यास कुटुंबाचा आधारच हिरावला जातो आणि आर्थिक संकट उभे राहते. तर गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना उपचार, शस्त्रक्रिया, दीर्घकालीन औषधोपचार आणि काही वेळा कायमस्वरूपी अपंगत्वालाही सामोरे जावे लागते. आतापर्यंत अशा प्रत्येक घटनेनंतर स्वतंत्र प्रस्ताव तयार करून प्रकरणनिहाय निर्णय घ्यावा लागत होता. त्यामुळे एकाच प्रकारच्या दुर्घटनांमध्ये वेगवेगळे निकष लागण्याची शक्यता होती. ही विसंगती टाळण्यासाठी आणि पारदर्शक, समान निकषांवर मदत देता यावी यासाठी एक सर्वसमावेशक धोरण असावे, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आणि त्याचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला. --चौकट या प्रस्तावाला लेखा विभागाचा अभिप्राय घेण्यात आला होता. त्यानंतर विधी विभागाच्या पॅनेलवरील ॲड. रेवतो कोतवाल यांचा कायदेशीर सल्ला घेण्यात आला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये झाड पडून झालेल्या अपघाती मृत्यू किंवा दुखापतीपोटी नुकसानभरपाई देण्याची थेट तरतूद नसल्याचे सल्ल्यात स्पष्ट करण्यात आले. मात्र मानवीय दृष्टिकोनातून आणि सामाजिक जबाबदारी म्हणून महापालिका स्वतःच्या निधीतून असे धोरण निश्चित करू शकते, असे मत विधी सल्लागारांनी दिले. प्रशासनाने हा प्रस्ताव मांडताना अलीकडच्या चार प्रकरणांचा विशेष संदर्भ दिला आहे. त्यात २ जुलै २०२५ रोजी राहुल अशोक देशमुख यांनी दिलेली नोटीस आणि २०२६ या वर्षात सिद्धार्थ आढव, प्रणव तुषार पवार आणि नीलेश अशोक जोशी यांनी केलेले अर्ज यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर भविष्यात घडणाऱ्या अशाच दुर्घटनांसाठी आधीच स्पष्ट नियमावली असावी, जेणेकरून पीडितांना तातडीने मदत देता येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. नवीन धोरणानुसार नैसर्गिक कारणाने महापालिका हद्दीतील झाड पडून नागरिकाचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास घटनेची पडताळणी, पंचनामा, वैद्यकीय अहवाल आणि पात्रता तपासून महापालिकेच्या निधीतून आर्थिक मदत अथवा नुकसानभरपाई दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com