नगरपंचायत क्षेत्रासाठी वृक्ष प्राधिकरणाची स्थापना
नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत मान्यता
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. ६ : शिंदखेडा नगरपंचायत क्षेत्रातील वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे तसेच शहरातील हरित क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने शिंदखेडा नगरपंचायत क्षेत्रासाठी वृक्ष प्राधिकरण स्थापन करण्यास नगरपंचायतीच्या ५ नोव्हेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.
वृक्ष प्राधिकरणाच्या पदसिद्ध अध्यक्षपदी शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहतील. तसेच, प्राधिकरण सदस्य म्हणून नगरपंचायत सदस्यांमधून सदस्यांची निवड करण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या सदस्यपदी सुयोग भदाणे, दीपक माळी, सुनीता देसले, शितल सोनवणे याशिवाय वृक्षसंवर्धन व पर्यावरणविषयक कामकाजात योगदान देण्यासाठी दोन अशासकीय सदस्यांचीही निवड करण्यात आली.
वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरातील वृक्षांची गणना व नोंदणी, वृक्षांचे संरक्षण व संवर्धन, वृक्षारोपण, वृक्षांचे पुनर्रोपण, वृक्षतोडीच्या परवानगीसंबंधी कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच, नागरिक, स्वयंसेवी संस्था, शाळा व महाविद्यालयांच्या सहभागातून वृक्षसंवर्धन व पर्यावरणविषयक जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शहराचा शाश्वत विकास साधताना पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि भावी पिढ्यांसाठी हरित शिंदखेडा निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सर्व नागरिकांनी नगरपंचायतीच्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे.
सर्वसाधारण सभेस नगराध्यक्षा कलावती माळी, उपनगराध्यक्ष उदय देसले, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे, वरिष्ठ लिपिक विवेक डांगरीकर उपस्थित होते.