आदिवासी विकास महामंडळाचे लेखापाल निलंबित
खरेदीतील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : आदिवासी विकास विभागाच्या मुख्यालयातील राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे लेखापाल संतोष आमटे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी या संदर्भातील आदेश जारी केला आहे.
कार्यालयीन खरेदी व्यवहारातील अनियमितता, वेतनातून नियमाबाह्य कपात, दुबार देयक तसेच महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी चौकशी समिती गठित करण्यात आली होती. त्यानंतर चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आमटे यांना २२ ऑक्टोबर २०२६ ला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर २७ सप्टेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. समितीचा अहवाल आणि अंतर्गत लेखापरीक्षणातील निष्कर्ष विचारात घेऊन अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यापूर्वीही त्यांच्यावर अनेकदा कारवाई झाल्याचे सांगण्यात येते.
जुन्नर येथे मुख्यालय
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ आणि महामंडळाच्या सेवा नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन काळात आमटे यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देय राहणार आहे. त्यांचे मुख्यालय जुन्नर येथे निश्चित करण्यात आले आहे.