(पान ४ ला ॲंकर)
WRS26B02879
नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड व अपर आयुक्त दिनेश पावरा यांच्यासोबत विविध मागण्यांवर चर्चा करताना संघटनेचे पदाधिकारी.
-----------
अनुदानित आश्रमशाळांतील प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही
नाशिक येथे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांसोबत संघटनेची सहविचार सभा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : अनुदानित आश्रमशाळांमधील अधीक्षक, अधीक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अनुदानित अधीक्षक- अधीक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या पुढाकाराने आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड आणि अपर आयुक्त दिनेश पावरा यांच्यासोबत सहविचार सभा झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध ११ मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित मागण्यांवर लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय, आर्थिक आणि सेवाविषयक अडचणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडल्या. अधीक्षक व अधीक्षिका यांच्यासाठी सरसकट सहाय्यक अधीक्षक-अधीक्षिका पदे निर्माण करून ती अनुदानित आश्रमशाळांसाठी लागू करावीत, परिचारिकांची रिक्त पदे तातडीने भरावीत आणि १४३३ मधील थकीत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे, अशी मागणी करण्यात आली.
कर्मचाऱ्यांना १०, २० व ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करणे, साप्ताहिक व सार्वजनिक सुट्ट्या लागू करणे आणि बंद करण्यात आलेला घरभाडे भत्ता पुन्हा सुरू करणे, या मागण्यांकडेही संघटनेने लक्ष वेधले. अधीक्षक व अधीक्षिकांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी प्रकल्प कार्यालयात दरमहा बैठक आयोजित करावी, त्यांना वेळोवेळी निवासी प्रशिक्षण द्यावे, पुरुष अधीक्षकांचा कार्यभार पुरुष शिक्षकांकडे आणि महिला अधीक्षिकांचा कार्यभार महिला शिक्षिकांकडे सोपवावा, अशा मागण्या मांडण्यात आल्या. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांनी निवासी राहण्याबाबत योग्य नियोजन करावे आणि शासनाची परिपत्रके काढताना अनुदानित संस्थांचाही स्पष्ट उल्लेख करावा, अशी भूमिका संघटनेने मांडली.
या मागण्यांमुळे अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या सेवा अटी, वेतन, भत्ते आणि कामकाजाच्या पद्धतींशी संबंधित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बैठकीला संघटनेचे राज्याध्यक्ष मनोहर कदम, राज्य सचिव नामदेव वाघ, उपाध्यक्ष माणिकचंद्र ताडम, कार्याध्यक्ष राजेश अहिरे, संपर्कप्रमुख किरण जोशी, मार्गदर्शक जगदीश सोनवणे, सदस्य रवींद्र पाटील, विभागीय अध्यक्ष दीपक सोनवणे, मारोती दर्शनवाड, श्री. गायकर यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतील अधीक्षक, अधीक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.