टुडे पान २
NSK26H32849
जळगावः जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमलेले आदिवासी बांधव.
-------------
दिवसभर आंदोलन, सायंकाळी निघाला तोडगा
आदिवासी बांधव पुन्हा रस्त्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोंडी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : वनहक्क दावे, आदिवासी शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न आणि विविध शासकीय योजनांच्या लाभासह प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी बांधव गेल्या चार दिवसांपासुन आंदोलनास बसले होते. लेखी आश्वासनानंतर आंदोलनास स्थगिती देण्यात आली होती. १७ रोजी पुन्हा आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले. लोक संघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या आंदोलकांमुळे परिसरात गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी झाली. ''
प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. लोक संघर्ष मोर्चाच्या संस्थापक अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित वैयक्तिक व सामुदायिक वनहक्क दाव्यांचा निपटारा, मंजूर वनपट्ट्यांमधील त्रुटी दूर करणे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि गावठाणातील घरांचे प्रश्न सोडविणे, अशा विविध मागण्यांसाठी मोर्चाने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
चौकट
आश्वासनांच्या पूर्ततेकडे लक्ष
या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मागण्यांच्या पूर्ततेसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. संबंधित प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मोर्चाची भूमिका आहे. आदिवासी बांधवांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. वनहक्क दाव्यांचा निपटारा, वनपट्ट्यांतील त्रुटींची दुरुस्ती, पीक नुकसानभरपाई, आदींची मागणीही करण्यात आली आहे.