शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या
---
तरुणाच्या त्रासाला कंटाळून संपविले जीवन : तरुणासह वसतिगृहातील दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ४ : तरुणाच्या त्रासाला कंटाळून येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. ३) सकाळी घडली. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तरुण व वसतिगृहातील दोन महिला कर्मचाऱ्यांवर नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
येथील चौपाळे रोडवरील शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृहात (तापी इमारत) २० वर्षीय विद्यार्थिनी वास्तव्यास होती. विद्यार्थिनी आणि विशाल सुरेश पावरा (वय २०, रा. आंबापूर, ता. शहादा) यांच्यात वाद झाला होता. विशालच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी संशयित विशाल पावरा वसतिगृहातील कर्मचारी नलिनी अहिरराव, छबीताई हरिदास डोंगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. सहायक निरीक्षक विश्वास भान्सी तापास करीत आहेत.
दरम्यान, पीडित विद्यार्थिनी गेल्या दोन वर्षांपासून वसतिगृहात वास्तव्याला होती. शहरालगतच्या एका महाविद्यालयात बीएस्सी नर्सिंगचे दुसऱ्या वर्षात ती शिक्षण घेत होती. तिची बहीणही याच वसतिगृहात वास्तव्याला आहे.
चौकट
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
नंदुरबार शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. रोशन गावित यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ही घटना अतिशय गंभीर आहे. वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. संशयित तरुण दोन वर्षांपासून वसतिगृहात येत होता. भाऊ म्हणून त्याची नोंद वसतिगृहाच्या रजिस्टरमध्ये केली जात होती, अशी माहिती समजली आहे. त्यामुळे वसतिगृहात येण्याची परवानगी त्या तरुणास कोणी दिली होती, याची चौकशी करावी. त्याचप्रमाणे कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी ॲड. रोशन गावित यांनी केली आहे.
कोट
वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी एका तरुणासह वसतिगृहाच्या दोन महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील तरुणाला अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
- विश्वास भान्सी, सहायक पोलिस निरीक्षक, नंदुरबार शहर
कोट
वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही बाब आदिवासी विकास विभागाने गांभीर्याने घेतली असून, चौकशी समिती स्थापन केली आहे. वरिष्ठांना घटनेची माहिती दिली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.
- चंद्रकांत पवार, प्रकल्प अधिकारी, नंदुरबार