कातकरी वस्त्यांवर
आज सेवा शिबिर
सिन्नर, ता.१२ ः भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहास तालुक्यात सुरुवात झाली आहे. सप्ताहात विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिली. गटविकास अधिकारी अशोक भवारी उपस्थित होते. सप्ताहानिमित्त शुक्रवारी (ता.१३) तालुक्यातील कातकारी वस्त्यांवर सेवा शिबिरे होणार आहेत.
११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात आदिवासी बांधवांना शासकीय योजना व शासकीय सेवांचा लाभ सुलभ करणे तसेच, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १३) तालुक्यातील ठाणगाव, आगासखिंड, बोरखिंड, कोनांबे येथील कातकारी वस्त्यांवर सेवा समाधान शिबिरे होणार आहेत. यात वीज पुरवठा, रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड यासह विविध विभागाच्या योजनांचे लाभ देण्यात येणार आहेत.
शनिवारी (ता.१४) नांदूरशिंगोटे येथे क्रांतीवर भागोजी नाईक यांच्या स्मारकावर दीपोत्सव होणार आहे. स्मारक परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. रविवारी (ता.१५) सर्व शासकीय कार्यालयांत जयंती सोहळा होणार आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती तहसीलदार देशमुख यांनी दिली.
-----------------