मुख्य अंक पान
--------------
13511
शिरपूर : कार्यशाळेचे उद्घाटन करताना आमदार काशिराम पावरा व पदाधिकारी.
आदिवासी युवकांनी उद्योगातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे
आमदार काशिराम पावरा : शिरपुरात रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. १६ : तालुक्यात उद्योग उभारणीसाठी अनेक संधी उपलब्ध असून, आदिवासी युवकांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वयंरोजगार व उद्योजकतेकडे वळावे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन आमदार काशिराम पावरा यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि आर. सी. पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्यातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आयोजित विद्यापीठस्तरीय उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ.दीपक बाविस्कर अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.एस.जे.सुराणा उपस्थित होते.
आमदार पावरा म्हणाले, की युवकांनी व्यवसायातील अडचणींना न घाबरता त्यातून मार्ग काढावा. आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योग व स्वयंरोजगारातून प्रगती साधावी. व्यसनांपासून दूर राहून आरोग्य जपावे आणि आपल्या संस्कृतीचे जतन करत काळानुसार प्रगती करावी. डॉ. सुराणा यांनी विद्यार्थ्यांनी उद्योजक होऊन स्वत: रोजगार निर्मिती करावी असे आवाहन केले.
डॉ. जितेंद्र तलवारे, डॉ. श्यामसुंदर पंचोली, शांतिलाल बंबोरिया आणि डॉ. लक्ष्मीकांत झंवर यांनी अनुक्रमे लघुउद्योग, स्थानिक संसाधनांवर आधारित व्यवसाय, बँक कर्जयोजना आणि उद्योजकतेसाठी ध्येय निश्चिती याविषयी मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ. बाविस्कर यांनी प्रास्तविक, जागृती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जे. एल. चौधरी यांनी आभार मानले. समन्वयक डॉ. तुषार माळी, डॉ. गजानन खेकाडे आणि डॉ. व्ही. एस. पुराणिक यांनी संयोजन केले.