
Garib Kalyan Yojana : आदिवासींना मिळतोय भेसळयुक्त तांदूळ! गरीब कल्याण योजनेची स्थिती
नाशिक : कोरोनाच्या काळापासून गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य दिले जाते. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त योजनेची मुदतवाढ झाली आहे. पेठ तालुक्यातील आदिवासींना योजनेतून मिळणाऱ्या तांदळात प्लॅस्टिकसारख्या दाण्यांची भेसळ मिळत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने भेसळयुक्त तांदूळ खावा की नाही, असा प्रश्न आदिवासींपुढे उभा ठाकला आहे. (Tribals getting adulterated rice Status of Garib Kalyan Yojana nashik news)
आदिवासी कुटुंबांनी भेसळयुक्त तांदळाची मोजणी केल्यावर पन्नास किलोच्या गोणीमध्ये आठ किलोपर्यंत भेसळ येत असल्याचे निदर्शनास आले आहे. एवढेच नव्हे, तर तांदळाच्या गोणीचे वजन तीन किलोने कमी मिळत असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे.
कमी तांदळामुळे नुकसान सहन करावे लागत असताना लाभार्थ्यांशी होणाऱ्या वादाला दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर तांदूळ आदिवासी भागात पाठवला जातो, त्याठिकाणी तपासणी होते की नाही? हा प्रश्न आदिवासींमधून उपस्थित केला जात आहे.
भेसळयुक्त तांदळाची समस्या कायम असताना तांदूळ शिजत नसल्याचे आदिवासी कुटुंबांच्या ध्यानात आलेले आहे.
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
"आमच्या पाड्यावर गेल्या दोन महिन्यांपासून रेशनमधून भेसळयुक्त तांदूळ येत आहे. देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्तच्या योजनेतील तांदळातील भेसळीचे दुःख आहे. त्यामुळे तांदूळ पुरवला जातो त्याठिकाणी छापे टाकून तपासणी व्हायला हवी. तसे घडल्यास आदिवासींच्या आरोग्याच्या प्रश्न गंभीर होणार नाही." -रामदास भोये (फणसपाडा)
"गेल्या दोन महिन्यांपासून आमच्या पाड्यावर भेसळयुक्त तांदूळ येत आहे. हा भेसळयुक्त तांदूळ शिजत नाही. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आम्हाला सतावू लागला आहे. आम्हाला दर्जेदार तांदूळ मिळावा, अशी आमची मागणी आहे.:- सुगंधाबाई भोये (खरपडी पाडा)