त्र्यंबकेश्वर पालिकेत ‘वॉररुम’
ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांना गती देतानाच विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यासाठी मुख्यमंत्री वॉररुमच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत वॉररुम कार्यान्वित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले.
ध्वजारोहण सोहळ्यास अवघे २३ दिवस शिल्लक असून, देशभरातून प्रमुख साधू-महंतांसह व्हीव्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन सुरू आहे. कुशावर्त कुंडाची स्वच्छता, रस्त्यांची कामे, पुरातन मंदिरे व कुंडांचे जीर्णोद्धार यांसह विविध विकासकामांना वेग देण्यात आला आहे. मात्र, या कामांमुळे नागरिक आणि भाविकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
पालिकेतील प्रस्तावित वॉररुममधून सिंहस्थाशी संबंधित विकासकामांचा नियमित पाठपुरावा करावा. विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखतानाच सुरू असलेल्या कामांच्या दर्जावर आणि गुणवत्तेवरही बारकाईने लक्ष द्यावे, असेही प्रसाद यांनी सांगितले.
पितृपक्षानंतर स्वच्छता मोहीम
पितृपक्षामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये श्राद्धविधी व अन्य धार्मिक विधींसाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे शहर व परिसरात अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. सिंहस्थाच्या ध्वजारोहणाला अवघे तीन आठवडे राहिल्याने पितृपक्ष संपताच शहरात तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.