पान-३
NSK26H32029
त्र्यंबकेश्वर ः येथे सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेजारी मंत्री गिरीश महाजन,, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार आदी.
--------------
३६-४
विकासकामांमुळे त्र्यंबकेश्वरचा चेहरा बदलणार
-------
मुख्यमंत्री ः कामे निर्धारित वेळेत, गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना
--------
त्र्यंबकेश्वर, ता.११ ः आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली विविध विकासकामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत. या कामांमुळे त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार आहे. पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच भाविक, पर्यटक आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू असलेली सर्व कामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
--------------
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ व गोदाघाटाच्या कामांची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि भविष्यातील नियोजनाची माहिती घेतली. कामांची गती वाढवून ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पालकमंत्री गिरीश महाजन, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव तथा पालक सचिव एकनाथ डवले, आमदार हिरामण खोसकर, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ व गोदाघाट परिसरातील कामे आव्हानात्मक असली तरी ती नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, परिसराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वरचे महत्त्व अधिक व्यापक करण्यासाठीही या कामांचा उपयोग होणार आहे.
-----------------