दिवाळी सुट्यांमुळे त्र्यंबकेश्वरात भाविकांची मांदियाळी
---
पूर्व दरवाजातून दर्शनासाठी सहा ते सात तास, तर देणगी दर्शनासाठी तीन तासांचा कालावधी
सकाळ वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर, ता. १४ : दिवाळीच्या सुट्यांमुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सलग सुट्यांचा लाभ घेत राज्याच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.
पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागण्यास सुरुवात होत असून, पहाटे चारपासून भाविक मंदिर परिसरात दर्शनाच्या प्रतीक्षेत उभे राहत आहेत. जसजसा दिवस पुढे सरकत आहे, तसतशी गर्दीत वाढ होत आहे. भाविकांची संख्या वाढल्याने दर्शनासाठीही अधिक वेळ लागत आहे.
मंदिराच्या पूर्व दरवाजातून सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी सुमारे सहा ते सात तासांचा कालावधी लागत आहे. तर देणगी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुमारे तीन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे.
दिवाळी सुट्यांचा कालावधी संपेपर्यंत भाविकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे. भाविकांनी दर्शनासाठी येताना संयम बाळगावा, तसेच मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.