पान-१
-------
NSK26H33955
त्र्यंबकेश्वर ः सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे करण्यात आलेली आकर्षक रोषणाई. (छायाचित्र ः कमलाकर अकोलकर)
-------
३६-३
त्र्यंबकेश्वर मंदिर आज, उद्या बंद
-------------
ध्वजारोहण सोहळा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; पासधारकांनाच प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२९ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यानिमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी (ता.३१) श्री त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देत पूजन करणार आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.३०) आणि शनिवारी (ता.३१) मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंदिर बंदचे आदेश काढले आहेत. या कालावधीत केवळ पासधारकांनाच मंदिरात प्रवेश असेल.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळा अवघ्या ४८ तासांवर येऊन ठेपला आहे. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण होणार आहे. यानंतर राष्ट्रपती त्र्यंबकेश्वरला भेट देणार आहेत. यावेळी त्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात पुजन करणार असून कुशावर्त तीर्थ येथे ध्वजपुजन करतील. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्यासह अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
राष्ट्रपती मुर्मू व इतर महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर मंदिरात गर्दीचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.३०) दुपारी १२ पासून ते शनिवारी (ता.३१) सायंकाळी सहापर्यत मंदिरात सर्वसामान्य भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. या कालावधीत मंदिर ट्रस्ट व पोलिस विभागाने दिलेल्या पासधारकांना केवळ मंदिरात प्रवेश करता येणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे १३४ प्रमाणे कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
---
१६-१
वाहनांना शहरात प्रवेशबंदी
राष्ट्रपती दौऱ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर शहरात प्रतिबंधित परिसरात अतिमहत्वाच्या व्यक्तीवगळता बाहेरून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. हे आदेश शुक्रवारी (ता.३०) सकाळी सहापासून ते शनिवारी (ता.३१) सायंकाळी ८ पर्यंत लागू असतील. बाहेरच्या वाहनांसाठी जुना जव्हार फाटा, थ्री लिव्हज हॉटेल, कुंभारतळे वाहनतळ, निवृत्तीनाथ मंदिर तसेच रिंगरोड असा मार्ग ठरवून देण्यात आला आहे. या दरम्यान, नवीन जव्हार फाटा तसेच रिंगरोडपासून बाहेरच्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.
-------------------