छायाचित्र आहे...
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर बंद होण्याची शक्यता धूसर
कुंभमेळ्याच्या कामांचा वेग वाढला; स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर, ता. १४ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीत विकासकामांची घाई सुरू असून, आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने बंद ठेवण्याच्या चर्चेमुळे भाविक आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, मंदिर बंद ठेवण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती देवस्थान कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे मंदिर बंद होण्याची शक्यता तूर्तास कमी असल्याचे चित्र आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला सध्या वेग आलेला असला, तरी मंदिराच्या डागडुजीचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. मंदिराभोवती उभारण्यात आलेल्या बांधकामाच्या पहाड्यांपैकी निम्म्याहून अधिक काढण्यात आल्या आहेत, असे असताना आता मंदिर बंद ठेवल्यास कामे कितपत वेगाने पूर्ण होतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देश-विदेशातून श्रद्धेने त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांना ऐनवेळी दर्शनापासून वंचित ठेवणे योग्य ठरेल का, अशी विचारणाही भाविकांकडून होत आहे.
मंदिर बंद झाल्यास अर्थचक्राला ‘ब्रेक’
त्र्यंबकेश्वरचे अर्थचक्र प्रामुख्याने भगवान त्र्यंबकेश्वर आणि गोदावरीच्या धार्मिक महात्म्यावर अवलंबून आहे. मंदिर बंद राहिल्यास भाविकांची संख्या घटून हॉटेल, पूजा साहित्य विक्रेते, लहान व्यावसायिक आणि इतर घटकांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या अनेक व्यावसायिकांवर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ येऊ शकते. व्यवसाय आणि घरांसाठी कर्जे घेतलेल्या नागरिकांची चिंता यामुळे वाढली आहे.
मंदिर बंद ठेवण्याची चर्चा सुरू झाल्यापासून भाविकांची संख्या रोडावल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. ऐन सणासुदीच्या काळात व्यवसाय ठप्प झाल्यास आर्थिक संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
देवस्थानच्या कोट्यवधींच्या उत्पन्नावर परिणाम
त्र्यंबकेश्वर मंदिर बंद राहिल्यास देवस्थानचे दरमहा सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचे उत्पन्न बुडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मंदिरातील कर्मचारी, विविध व्यवस्था, सण-उत्सव, दैनंदिन नैवेद्य, दिवाबत्ती आणि इतर धार्मिक खर्चांवर होऊ शकतो, असे विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनी सांगितले.
आणीबाणीच्या परिस्थितीत धार्मिक स्थळे बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. मात्र, सध्या तशी परिस्थिती नसताना वर्षभरापासून सुरू असलेल्या कामांसाठी मंदिर बंद ठेवण्याची गरज काय, असा सवालही उपस्थित होत आहे. दोन महिन्यांसाठी जाहीर झालेली बंदची मुदत प्रत्यक्षात पाच ते सात महिन्यांपर्यंत वाढल्यास स्थानिकांची अवस्था अधिक बिकट होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
कुंभमेळ्याच्या कामांवरूनही प्रश्नचिन्ह
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत काही कामांना प्राधान्य देताना हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांचे विस्थापन झाल्याची नाराजी स्थानिकांमध्ये आहे. दुसरीकडे अपुऱ्या पावसामुळे शेतकरीही अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा मर्यादित स्वरूपात आयोजित करून उपलब्ध निधीतील काही रक्कम पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरता येईल, असा मतप्रवाहही पुढे येत आहे.
कुशावर्त तीर्थालगतच्या म्हातारं ओहळातील पाण्याचा निचरा होत नसल्याने तेथे पाणी साचून राहत आहे. पुढील रस्ता उंचावर असल्यामुळे निचऱ्याचा प्रश्न कायम असल्याचे चित्र आहे.
ध्वजस्तंभांची आज प्रतिष्ठापना
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी साडेनऊला ध्वजस्तंभांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या तयारीला वेग येत असतानाच त्र्यंबकेश्वर मंदिर सुरू राहणार की ते बंद ठेवले जाणार, याबाबतच्या अंतिम निर्णयाकडे भाविक, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.