ज्ञान, भक्ती अन् साधनेची भूमी
त्र्यंबकेश्वर परिसरातील प्रमुख देवस्थाने
---
त्र्यंबकेश्वर मंदिर
त्र्यंबकेश्वर हे जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर आहे. जगभरातील भाविकांची सतत दर्शनासाठी व पूजेसाठी वर्दळ सुरू असते. मुख्यत्वे श्रावण महिना, शिवरात्र, दसरा, दीपावली, कार्तिक पौर्णिमा रथोत्सव यासह नेहमीचे सणवार येथे धार्मिक व पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. त्रिकाल देवस्थानतर्फे पूजा होते. रात्री साडेआठच्या सुमारास भाविकांना पाहता येईल अशी आरती होते. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाण्यासाठी अमृतकुंभ नावाचे तीर्थ आहे. त्याचे पाणी नित्य अभिषेक व पूजेसाठी वापरले जाते. त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी दोनशे रुपये माणशी त्वरेने दर्शनासाठी पास दिले जातात, तर विश्वस्त मंडळ येथील सर्व कारभार बघतात. येथे मंदिरात अभिषेक व इतर पूजा स्थानिक पुरोहित करतात.
---
कोलंबिकादेवी
कौलाचार करणाऱ्या भाविकांची मुख्य देवी. ब्रह्मगिरी पर्वतावर डाव्या बाजूला वराह तीर्थालगत आहे. साडेसातशे दगडी पायऱ्या चढून गेल्यावर हे मंदिर आहे. उभ्या खडकावर ही देवीची विशाल मूर्ती कोरलेली आहे. मुंबई भागातील काहींची ही कुलस्वामिनी आहे. कौल संप्रदाय हा गोदावरी नदीच्या दोन्ही तटावर प्राचीन काळी अस्तित्वात होता. यात कौलविद्येचे प्रसार व प्रचार करण्यासाठी शिक्षणाची सोय असे. यात विविध गुण विद्या असत. त्र्यंबकेश्वर येथून या विद्या प्रथम दक्षिण भारतात व तेथून उत्तर भारतात प्रसिद्ध पावल्या होत्या. कालांतराने त्या लोप पावल्या असाव्यात. याच भागात नवनाथ कालातील नाथांचे उपासना केंद्र म्हणून प्रख्यात झाले. येथे लगतच अनुपान शिळा असून, गोरक्षनाथांनी चौऱ्यांशी सिद्धनाथांना येथे ज्ञान दिले आहे. या देवी मंदिरालगतच गहिनीनाथांची गुंफा असून, तेथे ते उपासना करत असत.
---
निवृत्तिनाथ मंदिर
त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी निवृत्तिनाथ महाराजांची समाधी आहे. या समाधीवर मंदिर बांधले आहे. वारकरी सांप्रदायिक निवृत्तिनाथ महाराजांना प्रत्यक्ष शंकराचा अवतार मानतात. पैठण तालुक्यातील आपेगावचे विठ्ठलपंत कुलकर्णी त्र्यंबकेश्वरी येऊन राहिले. ते रोज ब्रह्मगिरी पर्वतास प्रदक्षिणा करीत. त्यांच्यासमवेत पुत्र निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई असत. याच पर्वत भागात निवृत्तिनाथ रस्ता चुकल्याने गहिनीनाथांच्या गुंफेत पोहोचले; तेथे त्यांना गहिनीनाथांची कृपा व ज्ञान मिळाले. त्यांनी आपल्या तिन्ही भावंडांना हे ज्ञान दिले. निवृत्तिनाथांच्या कृपाप्रसादाने ज्ञानदेवांनी भावार्थदीपिका आणि अमृतानुभव असे दोन अलौकिक ग्रंथ निर्माण केले. निवृत्तिनाथांचे अभंग असून, त्यांनी आपल्या भावंडांच्या साक्षीने ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी समाधी ज्येष्ठ वद्य द्वादशी शके १२१९ मध्ये घेतली. पौषवद्य एकादशीला येथे नाथांची मोठी यात्रा भरते. लाखांहून अधिक वारकरी येथे हजेरी लावतात. पायी दिंड्या दूरवरून येथे पोहोचतात. प्रती महिन्याला वारीसाठी वारकरी दर्शनासाठी एकादशीला येतात.
---
गजानन महाराज संस्थान
शेगाव संस्थान (जि. बुलडाणा) यांचे मंदिर त्र्यंबकेश्वर येथे उभारले असून, १९८९/९० च्या दशकात इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्वरेने येथे भाविकांची निवासाची व्यवस्था करण्याचे काम या संस्थेने सुरू केले. आज येथे रहिवासी इमारतींचा समूह तयार असून, भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्था उत्तम आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रतिवर्षी निवृत्तिनाथ यात्रा काळात लाखो भाविकांना मोफत अन्नछत्र तसेच अल्पोपाहार, दिंड्यांना भजनी साहित्यवाटप करण्यात येते. त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध संस्था म्हणून गजानन महाराज संस्थान अग्रेसर आहे. येथील सेवक व अधिकारी वर्ग सेवा म्हणून येथे कार्यरत असतात. मंदिराच्या प्रांगणात धार्मिक कार्यक्रमांचे रोज आयोजन करण्यात येते. सकाळ-सायंकाळी पूजा व आरती होते.
---
स्वामी समर्थ गुरुपीठ
दत्त सांप्रदायिक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची आता जगभर प्रसिद्धी व केंद्र निर्माण झाले आहेत. दिंडोरी येथील रहिवासी मोरेदादा यांनी महाराष्ट्रातील भाविकांना दत्त संप्रदायात सेवा करण्यासाठी व भरकटलेल्या सेवेकरी भक्त यांना दत्तसेवा करण्यासाठी सदोदित मार्गदर्शन केले. त्यांचे पुत्र अण्णासाहेब मोरे यांनी दादासाहेबांनी लावलेल्या या रोपांचे मोठ्या वृक्षात रूपांतर केले असून, देशाच्या बाहेर व देशातील प्रत्येक छोट्या गावखेडे ते शहरात स्वामी समर्थ सेवा केंद्र निर्माण केले. तेथे सेवेकरी भक्तांना उपासना मार्ग, स्वामी समर्थ सेवा व आदर्श जीवन करण्याचे व धार्मिक अडचणींना सामोरे जाण्याचे आध्यात्मिक मार्गदर्शन सुरू करण्यात आले. दिंडोरी येथे पहिले सेवा केंद्र, तर त्र्यंबकेश्वर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ विस्तीर्ण स्वामी समर्थ महाराज गुरुपीठ उभारले आहे.
---
परशुराम मंदिर
त्र्यंबकेश्वर गावातील पाच आळी या भागात कोकणस्थ ब्राह्मणांनी वर्गणी काढून १८७६ मध्ये परशुरामाचे मंदिर बांधले आहे. या मंदिराचे काम सागवान लाकूड वापरून केलेले आहे. येथे प्रतिवर्षी यज्ञयाग व अक्षयतृतीयेला भगवान परशुराम जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. त्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या मंदिराच्या आवारात पाटणकर व घैसास यांच्या ऋग्वेद पाठशाळा सुरू असून, विद्यार्थी वेदविद्या शिकण्यासाठी दूरवरून येतात. हे मंदिर व व्यवस्थेसाठी कोकणस्थ ब्राह्मणांनी उत्पन्न नसतानाही मंदिर व संस्था उभी करवून एक आदर्श निर्माण केला. येथे नुसते धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन न करता युवकांनी सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी परशुराम व्यायामशाळेची उभारणी केली.
---
अंजनेरी पर्वत
सातवाहन राजांचे मुख्य ठिकाण अंजनेरी हे होते. तो काल इसवी सन पूर्व दोनशे वर्षे. त्यानंतर सहाव्या शतकात चालुक्याने हा प्रदेश काबीज केला. नंतर राठोड, देवगिरीचे यादव, मोगल व पेशवे अशी स्थित्यंतरे घडत गेली. देवगिरीचा पाचवा राजा रामचंद्र यादव यांच्या ताब्यात इ.स. १२७१ ते १३०८ या काळात सत्ता आली. त्याचा मांडलिक असलेल्या राजाकडे अंजनेरी किल्ला व गाव कारभारासाठी दिले गेले. येथील किल्लादेखील यादवांनी बांधला आहे. अंजनेरी भाग महत्त्वाचा व जंगलात होता. धार्मिकदृष्ट्या येथे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. गडावर अंजनी मातेचे छोटे मंदिर असून, हनुमान जयंतीला चैत्रात येथे मोठी यात्रा भरते. वर पर्वतावर पाण्याचा तलाव आहे. वरच्या भागात गुंफा असून, देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. एकमुखी दत्तमंदिर असून, महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी येथे वास्तव्य केल्याचे संदर्भ आहेत. सध्याच्या कालावधीत या गावाची शेती व विविध विषयांत प्रगती झाली आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या काळात त्यांनी थंड हवेचे ठिकाण व वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी येथे त्यांचे निवासस्थान उभारले होते. त्याचे अवशेष अद्याप अस्तित्वात आहेत. राघोबादादा पेशव्यांनीदेखील येथे राहण्यासाठी वाडा बांधला होता. सध्या या भागात व्यवसाय व शिक्षणसंस्था यांची मोठी साखळी तयार झाली आहे.
---
ब्रह्मगिरी पर्वत
सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधील हा पर्वत समुद्रसपाटीपासून चार हजार २४८ फूट आहे. या पर्वतावरून गोदावरी नदीचे उगमस्थान असून, तीन राज्यांतून ती वाहत राजमहेंद्री (आंध्रात) बंगालच्या उपसागरात मिळते. धार्मिक तसेच भौगोलिक व ऐतिहासिक अशा सर्व दृष्टीने हा पर्वत प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक दृष्टीने हा अभेद्य किल्ला असून, यादवांच्या काळात या परिसरात भरभराट झाली होती. हा किल्ला जंगलात असल्याने सहज जिंकणे शक्य नव्हते. मुघलांच्या आधिपत्यात तो आल्यावर तेथे पोहोचणे शक्य नव्हते. या पर्वतरांगांत विविध प्रकारची धार्मिक देवदेवतांची मंदिरे असली तरी मुख्यत्वे उपासना केंद्र व तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या पर्वतामागून वैतरणा नदीचा उगम असून, मुंबई नगरीची तहान भागविण्याचे काम ही नदी करते. १९०८ मध्ये या पर्वतावर जाण्यासाठी हंगामी व गुजर या पंजाबी व्यापाऱ्यांनी दगडी पायऱ्या करून भाविकांची सोय करून दिली आहे.