फोटो : NSK26H32679
त्रिशूल : बंधाऱ्याच्या जलपूजनप्रसंगी उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल. शेजारी गणेश पराडके, सुरज पाडवी, दिलीप पाडवी आदींसह ग्रामस्थ.
-------------------
लोकसहभागातून उभारले अक्राणी वनराई बंधारे
त्रिशूल ग्रामस्थांच्या एकजुटीचे प्रशासनाकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १८ : सातपुड्याच्या दुर्गम भागात जल, जंगल आणि जमीन संवर्धनासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांना लोकचळवळीचे रूप दिले जात आहे. धडगाव तालुक्यातील त्रिशूल येथे लोकसहभागातून उभारलेल्या बंधाऱ्याचा ‘जल पूजन’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. कमी पाऊस आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व ओळखून ग्रामस्थांनी एकत्र येत नदीवर अक्राणी वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. कार्यक्रमास नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र दहातोंडे, गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
त्रिशूल गावातील ग्रामस्थांनी शासकीय मदतीवर अवलंबून न राहता लोकसहभागातून जलतारा प्रकल्पांतर्गत अक्राणी वनराई बंधारे बांधले आहेत. यावेळी ग्रामस्थांचे जलसंधारणाचे विविध प्रयोग मान्यवरांनी पाहिले. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि पाणी संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले. माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके यांनी त्रिशूल परिसरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये जलतारा निर्मिती, अक्राणी वनराई बंधारे, भूमी सुपोषण, सामुदायिक वन हक्क क्षेत्रावरील गवत लागवड, ‘प्रोजेक्ट हरियाली’ तसेच विविध क्षेत्रीय अभ्यासभेटींचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. स्थानिक गरजा, उपलब्ध नैसर्गिक संसाधने, वैज्ञानिक तंत्रज्ञान आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यांच्या समन्वयातून परिसराचा शाश्वत विकास साधला जात असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्रिशूलचे सरपंच सूरज पाडवी, पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप पाडवी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. या वेळी कुवरखेतचे सरपंच, जुगणीचे सरपंच यांच्यासह नगरसेवक पुरुषोत्तम पावरा, सातपुडा भगरचे संचालक दिलीप पाडवी आदी उपस्थित होते.
-------
कोट----
त्रिशूल परिसरात जल, जंगल, जमीनीचे संवर्धन करण्यासाठी लोकचळवळ सुरू आहे. पाण्यासाठी ‘चला एकत्र येऊ या’ या हाकेला साद देत गावाने एकजूट दाखवली आहे. ती सातपुड्यातील इतर दुर्गम गावांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. लोकसहभाग आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण पाण्याचे संकट नक्कीच दूर करू.
- गणेश पराडके, माजी जिल्हा परिषद सदस्य