कसारा घाटात ट्रक चालकाची बेदम मारहाण करत लुट; वाहतूक पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

कसारा घाटात ट्रक चालकाची बेदम मारहाण करत लुटले; पोलिसांवरही हल्ला

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटात बंद पडलेल्या वाहनचालकांना मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांना अर्धा तासाच्या थरार नाट्यानंतर मुख्य संशयितात पकडण्यास पोलिसांना यश आले. या झटापटीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. शुक्रवारी (ता. १) पहाटे साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांवर केला हल्ला

नाशिकहून मुंबईकडे लोखंडी प्लेट घेऊन जाणारा ट्रक (एमएच ४०, बीजी ६१६५) रात्री नवीन कसारा घाट उतरत असताना, गाडीचा पाटा तुटला. महामार्ग पोलिसाच्या मदतीने रात्री ट्रक रस्त्याच्या बाजूला लावण्यात आला. ट्रक चालकास महामार्ग पोलिसांनी मोबाईल क्रमांक दिला व पोलिस गस्तीसाठी निघून गेले. पहाटे साडेचारच्या सुमारास ट्रकजवळ एका दुचाकीवर तीन जण आले. काळे कपडे परिधान केलेल्या तीन तरुणांनी चालकास आवाज देत उठवून दादागिरी केली व ट्रकवर दगडफेक केली. ट्रकचालकाने प्रसंगवधन राखून महामार्ग पोलिसांना मोबाईल केला. तोपर्यंत तीन तरुणांनी ट्रकमधे चढून चालक विकी खोब्रागडे व क्लीनर निधी वासनिक यांना बेदम मारहाण केली व त्यांच्याकडील रोकड व मोबाईल हिसकावून घेतले. त्याच दरम्यान महामार्ग पोलिस घोटी केंद्रचे माधव पवार, मुरलीधर गायकवाड, दीपक दिंडे व संजय नंदन तिथे पोचले. पोलिस आल्याचे समजताच लुटारूंनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न करून जंगलात पळ काढला. तीनपैकी एका मुख्य सूत्रधार विजय रामदास ढमाळे (रा. इगतपुरी) याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले. हवालदार मुरलीधर गायकवाड यांनी त्याला पकडून ठेवले. दरोडेखोर विजय ढमाळे याने पोलिस कर्मचारी गायकवाड यांच्यावर हत्याराने हल्ला केल्याने ते जखमी झाले. अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला तब्यात घेतले व कसारा पोलिसांच्या तब्यात दिले. संशयिताकडे असलेली दुचाकी (एमएच १५, एचबी १०७५) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

हेही वाचा: परिक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या

कसारा घाटात पोलिसांच्या मदतीसाठी...

कसारा घाटात धारधार शस्त्र घेऊन लुटमार करणारी टोळी वाहंचालकांना दादागिरी व मारहाण करीत असून, महामार्ग पोलिसांवरही दगडफेक करीत असल्याची माहिती मिळताच कसारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सलमान खतीब, पोलिस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य मदतीला पोचले. तोपर्यंत दोन जण पळून गेले, तर एका संशयितास महामार्ग पोलिसांनी पकडून ठेवले होते. पहाटे अंधारात घडलेल्या अर्धा तासाच्या या थरार नाट्यात शस्त्रधारी दरोडेखोरांशी दोन हात करणाऱ्या महामार्ग पोलिसांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा: नाशिक : कठडे नसलेल्या फरशीवरून ट्रॅक्टर कोसळला नाल्यात

Web Title: Truck Driver Was Beaten And Robbed In Kasara Ghat Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top