esakal | कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या त्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

बोलून बातमी शोधा

viral video of Chandwad
कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..
sakal_logo
By
हर्षल गांगुर्डे

गणूर (जि. नाशिक) : श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने चांदवड येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने पायरीवर प्राण सोडल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता दरम्यान आता त्या व्हिडीओमागील सत्य समोर आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध

अरुण उत्तम माळी (वय ३०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून ते खंडाळवाडी, वडनेरभैरव येथील रहिवासी आहेत. कोरोना लागण झाल्यानंतर श्वास घेण्यास तीव्र त्रास जाणवू लागल्याने कुटुंबातील व्यक्तींनी त्यांना चांदवड येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले, मात्र पायरीवर असताना अचानक ते कोसळल्याचं व्हायरल व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्यांना बाहेर बसावं लागल्याचं समोर येत आहे. शिवाय ते कोसळण्यापूर्वी डॉ. रमाकांत सोनवणे यांनी मृत उत्तम माळी यांना तपासलं, यात ऑक्सिजनची पातळी प्रचंड घसरल्याने त्यांना दाखल करून घेण्यासाठी बेड ऍडजस्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र ते सुरु असताना ते कोसळले व यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सीसीटीव्ही फुटेज रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध आहेत अशी माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

निलंबनाची कारवाई करण्याची मागणी

दाखल झालेल्या रुग्णाची तात्काळ दखल घेण्यात आली परंतु ऑक्सिजनची घसरलेली पातळी अन बेड ऍडजस्ट करण्यात गेलेल्या वेळेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधीक्षक सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलं. तर या घटनेबाबत थेट डॉ. शिंदे यांच्या निलंबनाची मागणी शहरातील संघटनांनी केली आहे. दरम्यान घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर दुसरीकडे डॉ. साधना तायडे, आरोग्य संचालक मुंबई यांनी चांदवड कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीमती तायडे यांच्याकडे कोरोनाबाधित रुग्ण पायरीवर जीव सोडतो याला वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदेच जबाबदार असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संदीप उगले, पांडुरंग भडांगे, राजाभाऊ आहिरे, दत्तात्रेय गांगुर्डे, सोमनाथ जाधव, विकी गवळी, रामेशवर भावसार आदी उपस्थित होते.

असा घडला घटनाक्रम

ता. २० रोजी मृत माळी यांना त्रास जाणवू लागला

दुपारी २.५१ मिनिटांनी खाजगी वाहनातून ते चांदवड कोविड सेंटरला दाखल

दु. २. ५५ मिनिटाला डॉ. सोनवणे यांच्याकडून तपासणी

दु. २. ५८ मिनिटाला प्राणवायू पातळीची नोंद ३२-३५%

बेड उपलब्ध नसल्याने बेड ऍडजस्ट करण्यासाठी प्रयन्त

दु. ३. ०५ मिनिटाला रुग्ण कोसळला

दु. ३. ०८ मिनिटाला रुग्ण स्ट्रेचरवर

दु. ३. ११ मिनिटांनी रुग्ण मृत झाल्याचे डॉ. सोनवणे यांच्याकडून जाहीर