त्र्यंबकरोडवर रंगीत तालीम दरम्यान अपघात
पोलिसांची वाहने एकमेकांवर धडकली : एक जखमी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २७ : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहण शनिवारी (ता. ३१) होत असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नाशिकचे ध्वजारोहण झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत. त्या अनुषंगाने मंगळवारी (ता. २७) रंगीत तालीम घेण्यात आली असता, पोलिस ताफ्यात एक खासगी वाहन आल्याने ताफ्यातील पोलिस वाहने एकमेकांवर धडकल्याची घटना घडली. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे माहिती समोर येत आहे.
सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या अनुषंगाने मंगळवारी जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेने रंगीत तालीम केली. या तालिम दरम्यान त्र्यंबकरोडने रंगीत तालमीचा ताफा त्र्यंबकच्या दिशेने जात असताना सातपूरनजिक ताफ्यातील पहिल्या वाहनांसमोरच एक खासगी वाहन आले. त्यामुळे वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने या वाहनामागील पोलिस वाहनांच्या चालकांनाही अचानक ब्रेक दाबावे लागले. परिणामी ताफ्यातील काही वाहने एकमेकांवर जाऊन धडकली. या घटनेमध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे समजते. तर यात वाहनांचे किती नुकसान झाले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. सदरील घटना सोशलमीडियावर व्हायरल झाली.
दरम्यान, रंगीत तालीम सुरू असताना त्र्यंबक रोडवरील वाहतूक बंद करण्यात आलेली नव्हती. मात्र, प्रत्यक्ष शनिवारी (ता. ३१) नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या मार्गावरील वाहने पर्यायी मार्गाने वाहतूक करतील, तशी अधिसूचनाच जिल्हा प्रशासनाने जारी केलेली आहे