तुळशी विवाहापासून लगीनघाईला सुरुवात

तुळशी विवाहापासून लगीनघाईला सुरुवात
Published on: 
मेन -- दोन महिन्यात विवाहासाठी केवळ ११ मुहूर्त तुळशी विवाहापासून लगीनघाई; लॉन्स, केटरर्स, बॅण्ड पथकांचे होतेय बुकिंग सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : चातुर्मासाची सांगता आणि कार्तिक शुक्ल द्वादशीला शनिवारी (ता. २१) होणाऱ्या तुळशी विवाहासोबतच यंदाच्या लग्नसराईचा बिगुल वाजणार आहे. तुळशीच्या लग्नानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात विवाहाचे मोजकेच पण अत्यंत मुहूर्त असल्याने अवघ्या काही दिवसातच शहरात सनई- चौघड्यांचे सूर घुमू लागणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मार्केट तग धरण्याची ही अनायासे चालून आलेले संधी असल्याने लग्नसराईची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पंचांगानुसार, तुळशी विवाहानंतर नोव्हेंबरमध्ये २१, २४, २५ आणि २६ या चारच तारखांना विवाहाचे मुहूर्त आहेत. तर डिसेंबर महिन्यात २, ३, ४, ५, ६, ११ आणि १२ असे केवळ सातच मुहूर्त उपलब्ध आहेत. त्यानंतर १६ डिसेंबरपासून धनुर्मास (खरमास) सुरू होत असल्याने पुढील महिनाभर विवाहांना ब्रेक लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या या ११ मुहूर्तांवरच जास्तीत जास्त विवाह सोहळे पार पाडण्यासाठी वधू-वर पक्षांची लगबग सुरू आहे. मुहूर्तांची संख्या कमी असल्याने शहरातील बहुतांश लॉन्स आणि मंगल कार्यालये महिनाभरापूर्वी आरक्षित झाली आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि भव्य मंडप उभारणीची कामे वेगाने सुरू आहेत. एकाच दिवशी अनेक विवाह असल्याने गुरुजींची धावपळ होणार असून, सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही सत्रांतील वेळा आरक्षित झाल्या आहेत. वरातीच्या मिरवणुकीसाठी पारंपरिक ब्रास बॅण्ड, ढोल-ताशा पथके आणि आधुनिक डीजे साउंड सिस्टिमची मागणी वाढली आहे. नवरदेवाच्या शाही मिरवणुकीसाठी सजवलेले पांढरे शुभ्र घोडे आणि बग्गीही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एकंदरीत, तुळशी विवाहानंतर पुढील तीन आठवडे संपूर्ण शहर विवाहसोहळ्यांच्या आनंदात न्हाऊन निघणार आहे. दुष्काळाची झळ प्रत्येक व्यवसायाला बसत आहे. अशात येत असलेली लग्नसराई मार्केटसाठी संजीवनी ठरणार असून त्या दृष्टीने प्रत्येक व्यावसायिक त्याकडे पाहात आहे. ---कोट दाते पंचागानुसार, डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात खरमास असल्याने पुढील महिनाभर विवाह मुहूर्त नाही. नंतर मुहूर्त सुरू होतील. उपलब्ध असलेल्या ११ मुहूर्तांवरच वधूपित्यांचा भर आहे. पुढील वर्षांच्याही तारखा आहेतच. -अमोल किरपेकर, गुरुजी ---कोट यंदा मुहूर्त मोजकेच असल्याने एकाच दिवशी दोन तीन ऑर्डर्स आहेत. जागेनुसार ते ॲडजस्ट करण्याचे काम सुरू आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन मेजवानीसोबतच चाट आणि लाइव्ह काउंटर्सला वधू-वर पक्षाकडून मोठी पसंती मिळत आहे. -विशाल बाळसराफ, केटरर्स