esakal | नाशिकमध्ये अडीच महिन्यांतच वाढले ६७ टक्के बेड, ऑक्सिजन बेडमध्ये दुप्पट वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen beds available despite the scourge of growth!

नाशिकमध्ये अडीच महिन्यांतच वाढले ६७ टक्के बेड, ऑक्सिजन बेडमध्ये दुप्पट वाढ

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरात कोरोनावाढीचा वेग वाढताना रुग्णांना ऑक्सिजन बेडचीदेखील कमतरता भासत आहे. अडीच महिन्यांत सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयू, तसेच व्हेंटिलेटर बेडची संख्या ६७.१७ टक्क्यांनी वाढली आहे. यात ऑक्सिजन बेड दोन महिन्यांत तब्बल अडीच हजारांहून अधिक वाढविण्यात आले असून, ऑक्सिजन बेडची संख्या दुपटीने वाढली आहे.

कोरोना संसर्ग वेगाने वाढताना शहरातील कोपरान् कोपरा कवेत घेतला आहे. सद्य:स्थितीत पालिकेसह खासगी कोविड सेंटरमध्ये २१ हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत एक लाख ४५ हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात एक लाख २३ हजार रुग्ण रिकव्हर झाले आहेत. एक हजार २८१ मृत्यू आतापर्यंत झाले आहेत. रुग्ण वाढत असताना बेडची संख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षातील बेडची संख्या व जानेवारी २०२१ पर्यंत बेडची संख्या व त्यानंतर फेब्रुवारी ते १४ एप्रिलपर्यंत वाढलेल्या बेडची संख्या लक्षात घेता रुग्णवाढीचा वेग समोर येतो. एप्रिल २०२० मध्ये शहरात एकूण ६० बेड आरक्षित करण्यात आले होते. त्यात ४३ बेड सर्वसाधारण, दहा ऑक्सिजन, पाच आयसीयू, तर दोन व्हेंटिलेटर बेड होते. जानेवारी २०२१ मध्ये कोरोना रुग्ण वाढू लागल्यानंतर बेड आरक्षित करण्यात आले. चार हजार ३८६ बेडमध्ये सर्वसाधारण दोन हजार ३१२ बेड होते. ऑक्सिजन बेड एक हजार २८८, आयसीयू बेड ५१५, तर व्हेंटिलेटर बेड २७१ होते. बेड आरक्षित करण्याचे प्रमाण १७ टक्के होते.

अडीच महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी, मार्च व १४ एप्रिलपर्यंत बेडमध्ये तब्बल ६७ टक्के वाढ झाली. एप्रिल २०२१ मध्ये एकूण सहा हजार १३६ बेड होते. त्यात सर्वसाधारण बेड दोन हजार १३९, ऑक्सिजन बेड दोन हजार ५५१, आयसीयू बेड ८०१, तर व्हेंटिलेटर बेड ६३५ आरक्षित करण्यात आले. जानेवारीमध्ये १७ टक्के बेड आरक्षित करण्यात आले, तर एप्रिलच्या मध्यावर तब्बल ८४.२४ टक्के बेड आरक्षित केल्याने यावरून कोरोनाची दाहकता समोर येत आहे.

रुग्णवाढीच्या संख्येनुसार ऑक्सिजन बेडची संख्या वाढविली जात आहे. गेल्या अडीच महिन्यांत एकूण ६७ टक्के बेड वाढविण्यात आले असून, आवश्यकता भासल्यास आणखी बेड आरक्षित केले जाणार आहेत. - कैलास जाधव, आयुक्त, महापालिका