तक्रारीमुळेच ‘त्या’ घोटाळ्याची पोलखोल
मुक्त विद्यापीठ करणार परीक्षा प्रक्रियेतील त्रृटी दूर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील छत्रपती शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा मूल्यमापन केंद्रावर तब्बल १९ हजार २३१ उत्तरपत्रिकांची अनधिकृत शिक्षकांकडून तपासणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीतून हा प्रकार समोर आला. त्यामुळे या उत्तरपत्रिकांच्या आधारे जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल अधिकृत मानायचे कसे, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रकरणी प्राचार्यांसह ४८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानेही या प्रकाराची गंभीर दखल घेत परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे.
कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी सांगितले, की निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यापीठाला यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर तातडीने चौकशी समिती नेमण्यात आली. प्राथमिक चौकशीत तथ्य आढळल्याने निवृत्त न्यायमूर्तींमार्फत संशयितांचे जबाब नोंदविण्यात आले. संबंधितांनी अनधिकृतपणे उत्तरपत्रिका तपासल्याची कबुली दिली. त्यानंतर निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली पुरावे संकलित करून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, संबंधित सर्व उत्तरपत्रिकांची शहानिशा आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचा निकाल प्रलंबित नसल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.