
Nashik News: FCIचा कारभार चव्हाट्यावर! प्रश्नांची उत्तरे न दिल्याने केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघडणी
मनमाड (जि. नाशिक) : येथील अन्न महामंडळासंदर्भात (एफसीआय) आलेल्या तक्रारींबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मंगळवारी (ता. ३) एफसीआयला भेट देत पाहणी केली.
गोदामाची पाहणी करत असताना प्रश्नांची उत्तरे न दिल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. एफसीआयमधील कारभार चव्हाट्यावर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Union Minister dr bharati pawar shambles FCI governance of State for not answering questions Nashik News)
भारतीय खाद्य निगम अर्थात् अन्न महामंडळाचे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे गोदाम असून, येथून राज्यातील इतर भागात गहू, तांदूळ आदी धान्य सरकारी धान्य दुकानात पाठवले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अनेक सरकारी दुकानांमध्ये धान्य पोचत नसल्याची तक्रार आल्याने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सौ. पवार यांनी एफसीआयमध्ये पाहणी केली.
एफसीआयच्या प्रबंधक मनीषा मीना यांना त्यांनी एफसीआयमध्ये असलेल्या गहू, तांदळाचा प्रत्येक महिन्याचा किती साठा उपलब्ध आहे, किती वितरण केले गेले यासह इतर माहिती विचारली. मात्र, मीना यांना ही माहिती देता आली नाही. त्यामुळे सौ. पवार यांनी त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
हेही वाचा: SAKAL Impact | उपस्थिती भत्ता किमान प्रतिदिन 20 रुपये द्या: धनंजय मुंडेंचे शिक्षणमंत्री केसरकरांना पत्र
जानेवारी ते डिसेंबरचा साठा, पुरवठा किती, वाटप कसे केले जाते याबाबत विचारलेल्या प्रश्नांना अधिकारीदेखील समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. तसेच धान्य मोजले जाणारा वजनकाटा बंद आहे. एकाच काट्यावर काम सुरू असल्याचे या वेळी दिसून आले. येथून रोज शंभर ट्रक धान्य भरून पाठवले जात आहे. तसेच एफसीआयमध्ये असलेल्या गोदामाची पाहणी केली असता अस्वच्छता दिसून आल्याने मंत्री डॉ. पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जय फुलवाणी, जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, डॉ. सागर कोल्हे, एकनाथ बोडके, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, रिपाईंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर धिवर, कैलास अहिरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष मयूर बोरसे यांच्यासह अन्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, एफसीआयचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. एफसीआयमध्ये कार्यरत असलेल्या विविध कामगार संघटनांनी या वेळी कामगारांच्या समस्यांबाबत मंत्री डॉ. पवार यांना निवेदन देत आपले गाऱ्हाणे मांडले.
हेही वाचा: Nashik News : सुरगाणा ठरतोय स्ट्रॉबेरी पंढरी! चांगल्या उत्पादनाने आदिवासींचे स्थलांतरही थांबले