NSK26H33744
कुऱ्हे पानाचे : व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना प्रा. दीपक बारी व मान्यवर.
-----
अहंकाराला बाजूला सारले तर जीवन सुंदर
प्रा. दीपक बारी : जीवन सुंदर आहे’ या विषयावर व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२८ : दिवाळी आली की आपण घरातील कचरा साफ करतो, घर स्वच्छ करतो; पण मनात वर्षानुवर्षे साचलेला अहंकार, राग, द्वेष आणि अवास्तव अपेक्षांचा कचरा कधी साफ करणार? घर स्वच्छ करण्याइतकेच मन स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. जग बदलण्याचा प्रयत्न करण्याआधी स्वतःला बदलायला शिका. कारण जीवन सुंदर आहे; फक्त ते सुंदरपणे जगण्याची कला आपल्याला अवगत झाली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. दीपक बारी यांनी केले.
कुऱ्हे पानाचे येथे स्नेहबंध ज्येष्ठ सेवा संघ आयोजित कार्यक्रमात ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करीत होते. प्रा. बारी म्हणाले, की समुद्रातील वादळातून कुशल नाविक जशी नाव किनाऱ्यावर आणतो, तसेच संयम, श्रद्धा आणि विवेकाच्या बळावर जीवनातील संकटांवर मात केली पाहिजे. आयुष्य किती जगलो यापेक्षा कसे जगलो, किती माणसे जोडली आणि किती जणांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले, हे अधिक महत्त्वाचे आहे, असा भावनिक संदेश त्यांनी दिला.
स्नेहबंधाचे अध्यक्ष डॉ. टी. टी. बारी यांनी प्रास्ताविक केले. अरविंद बावस्कर यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्त मुख्याध्यापक कालिदास कळसकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी एम. के. बावस्कर, जी. के. पाटील, रामदास कोतवाल, संजय पाटील, नवल पाटील, आत्माराम धांडे, अरविंद बावस्कर, शशिकांत वराडे, प्रकाश अस्वार, संदीप बारी, महेंद्र रंदाळे, अरविंद बावस्कर उपस्थित होते.
-----