दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने
आर्थिक मदत द्यावी : प्रा. हिरालाल नरवाडे
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर, ता. ९ : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, पिके वाचविण्यासाठी खते, कीटकनाशके, फवारणी, मजुरी, सिंचन तसेच अन्य कृषी निविष्ठांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी प्रा. हिरालाल नरवाडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. पीकविमा, नमो शेतकरी, मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीसह दुष्काळ निधी तातडीने खात्यावर वर्ग करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध योजनेतील प्रलंबित अनुदान व मदत तातडीने वितरित करावी. पीकविम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी, मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी आणि दुष्काळ निधीची रक्कम त्वरित खात्यांवर वर्ग करावी, वस्तुनिष्ठ सरसकट पंचनामे करावेत, खते, बियाणे, कीटकनाशके व अन्य कृषी निविष्ठांवर आवश्यक अनुदान उपलब्ध करून द्यावे, सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे तसेच पिण्याच्या पाण्यासोबत चारा व पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार कर्जपुनर्गठनाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रा. नरवाडे यांनी केली आहे.